पिंपरी-चिंचवड भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी

पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहर भाजपाच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी संजय पटनी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष शत्रुघ्न यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संजय पटनी हे आमदार महेश लांडगे यांचे निष्ठावंत सहकारी म्हणून ओळखले जातात. पक्षाच्या संघटनात्मक कामात त्यांचा सक्रिय सहभाग असून विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांनी पक्षकार्य बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत.

नवनियुक्त वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटनी गेल्या १२ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या विविध संघटनात्मक उपक्रमांमध्ये पुढाकार घेतला आहे. प्रसिद्धीप्रमुख म्हणून त्यांनी आपल्या कार्यकाळात उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे पार पाडल्या आहेत. बूथ प्रमुख ते शहराध्यक्ष आणि शहराध्यक्ष ते प्रदेश कार्यालय अशा विविध पातळ्यांवर प्रभावी समन्वय साधणारा कार्यकर्ता म्हणून पक्षात त्यांची ओळख आहे.

दरम्यान, पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने इतर काही महत्त्वाच्या नियुक्त्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय खेळाडू अरुण पाडुळे यांची भाजपा क्रीडा प्रकोष्ठ शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच दिघी-गव्हाणेवस्ती-गवळीनगर मंडलाध्यक्षपदी प्रमोद परदेशी तर चिखली-कृष्णानगर मंडलाध्यक्षपदी अजय साने यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे शहरातील भाजप संघटनाला अधिक बळकटी मिळेल, असा विश्वास पक्ष पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. आगामी निवडणुका आणि संघटनात्मक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

नियुक्तीबद्दल संजय पटनी यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानले असून पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडत संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, पक्षाच्या विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.