पुणे, ऑक्टोबर २०२५ : जागतिक हृदय दिनानिमित्त आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलकडून “हास्याचा हार्टबीट” हा विशेष हास्य कार्यक्रम एका सायंकाळी आयोजित केला होता. हा कार्यक्रम म्हणजे हास्य, आरोग्य जनजागृती आणि समाजाचा सहभाग यांचा एक सुरेख मिलाफ होता. या उपक्रमाचा उद्देश हा ताण – तणाव कमी करणे, मन प्रसन्न करणे आणि हृदयाच्या आरोग्यास पाठबळ देणे हा होता. यासाठी १२०० हून अधिक नागरिकांनी उपस्थिती दाखवत आरोग्य आणि आनंदाचा एक अनोखा संगम घडवून आणला.
हा कार्यक्रम चिंचवड येथील रामकृष्ण मोरे नाट्यगृहात झाला. प्रसिद्ध मराठी व्यक्तिमत्त्व डॉ. निलेश साबळे आणि संदीप पाठक यांनी आपल्या विनोदातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत हृदयविकाराविषयी महत्त्वाचा संदेश दिला. यावेळी, टॉक-शो शैलीतील एका रंगतदार सत्रात डॉ. निलेश साबळे आणि संदीप पाठक यांनी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील हृदयरोग तज्ज्ञांशी संवाद साधला. यात डॉ. राजीव बुंदशाह सेठी, डॉ. राजेश बदानी, डॉ. अन्नपूर्णा कालिया आणि डॉ. समिथ श्रीनिवास चौटा यांचा समावेश होता. यावेळी, विचारण्यात आलेले मनोरंजक प्रश्न आणि त्यावर तज्ज्ञांनी दिलेले माहितींपूर्ण उत्तरे यांच्या माध्यमातून डॉक्टरांनी प्रेक्षकांना हृदयाच्या आरोग्याबाबत जागरूक केले. त्याचबरोबर गुंतागुंतीचा वैद्यकीय सल्ला हा सहज, रंजकपणे आणि समजण्यास सोपा करत दिला.
हृदयविकार अजूनही मृत्यूची एक प्रमुख कारण ठरत असल्याचे स्मरण जागतिक हृदय दिन हा जगाला करून देतो. त्याचा उद्देश फक्त हृदयविकाराचे उपचार करणे नसून त्याबाबत पूर्वतयारी करणे, जनजागृती करणे, जीवनशैलीत बदल करणे आणि मानसिक स्वास्थ्य जपणे हाही होता. “हसण्याचा हार्टबीट” या कार्यक्रमाद्वारे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने हा संदेश हास्याच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न केला. हास्य, विनोद, तणावमुक्ती आणि सकारात्मक सामाजिक नातेसंबंध हे सर्व हृदय-आरोग्यास उपयुक्त ठरतात असे शास्त्र सांगते.
याबाबत डॉ. निलेश साबळे म्हणाले, “तणाव आरोग्यावर किती परिणाम करतो मी पाहिले आहे. तर एक स्मितहास्य एखाद्याचा दिवस कसा बदलून टाकते हे देखील पाहिले आहे. आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलसोबत हास्य आणि हृदय-आरोग्य जनजागृती यांचा संगम घडवण्याचा हा उपक्रम खूप अर्थपूर्ण आहे. आम्ही लोकांना हसवले आणि त्याचबरोबर हृदयाच्या आरोग्याला गांभीर्याने घ्यावे हेही स्मरण करून दिले असून त्याने आमचे उद्दिष्ट साध्य झाले आहे.”
संदीप पाठक म्हणाले, “हृदयाचे आरोग्य हे फक्त वैद्यकीय तपासण्यांपुरते मर्यादित नाही. ते आपल्या जगण्याच्या पद्धतीत, छोट्या गोष्टींमधील आनंदात आणि आरोग्य जपण्याच्या पद्धतीत दडलेले आहे. हास्य हे एक सामर्थ्यशाली साधन आहे कारण ते तणाव निर्माण करणारे हार्मोन्स कमी करते, रक्तवाहिन्या शिथिल करते आणि एकूणच हृदयाचे आरोग्य सुधारते. या संदेशासाठी आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने हास्याचा मार्ग निवडला याचा मला आनंद आहे. लोक स्मितहास्य करत, हलकेफुलके होऊन आणि आपल्या आरोग्याबाबत अधिक जागरूक होऊन बाहेर पडताना पाहणे हृदयाला सुखावणारे होते.”
हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पामेश गुप्ता म्हणाले, “आमचा उपचारा इतकाच प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेवरही ठाम विश्वास आहे. ‘हसण्याचा हार्टबीट’ या कार्यक्रमाद्वारे आम्हाला वैद्यकीय जनजागृती आणि हास्याचा आनंद हा संदेश एकत्रितपणे पोहोचवायचा होता. कारण हास्य हेच हृदयासाठी खरे सर्वोत्तम औषध आहे.”
समाजाच्या आरोग्यविषयक गरजांना प्राधान्य देत, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने ‘केअर अॅट होम’ ही नवी सेवा सुरू केली आहे. या उपक्रमातून आवश्यक आरोग्यसेवा थेट रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचवली जाणार आहे.प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, दीर्घकालीन आजारांनी ग्रस्त रुग्ण तसेच शस्त्रक्रियेनंतर प्रवास करणे कठीण जाणाऱ्या रुग्णांना या सेवांचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत घरच्या घरी रक्त व इतर तपासण्यांसाठी नमुने गोळा करणे, नर्सिंग केअर, फिजिओथेरपी, अटेंडंट केअर, औषधांचे घरपोच वितरण आणि टेलीकन्सल्टेशन यांचा समावेश आहे.स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सुरू झालेल्या या उपक्रमातून हॉस्पिटलने रुग्णाभिमुख, सहज उपलब्ध आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवा पुरवण्याच्या आपल्या बांधिलकीची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे.
चांगले आरोग्य हे सकारात्मक दृष्टीकोन आणि तणावमुक्त जीवनशैली हे हाता हात घालून चालते हा संदेश या कार्यक्रमाने आरोग्यजागृती आणि मनोरंजन यांचा यशस्वी संगम घडवत अधोरेखित केला.
