पुणे: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडणाऱ्या छायाचित्र प्रदर्शनाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशन आणि केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने नवी दिल्ली येथे नुकतेच या पाच दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले होते. नरेंद्र मोदी यांच्या बालपणासून ते दूरदर्शी नेता व जागतिक पातळीवरील एक सर्वमान्य नेतृत्व असा जीवनपट या प्रदर्शनातून मांडण्यात आला.
प्रदर्शनामध्ये एकूण ६५ छायाचित्रे ठेवण्यात आली होती. या सर्व कलाकृती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे परिवर्तनकारी नेतृत्व, सेवेसाठी अढ़ळ वचनबद्धता आणि भारताच्या प्रगतीतील उल्लेखनीय योगदान अधोरेखित करतात. या प्रदर्शनाचे आयोजन विवेकानंद युथ कनेक्ट फाउंडेशनचे संचालक डॉ. राजेश सर्वज्ञ व फाउंडेशनचे समन्वयक अर्जुन हांगे यांनी केले.
प्रदर्शनाला सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई, केंद्रीय सांस्कृतिक कार्य मंत्री गजेंद्रसिंग शेखावत, भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शाम जाजू, अध्यात्मिक गुरु स्वामी चिदानंद सरस्वती महाराज, डॉ. आचार्य लोकेश मुनीजी, भाजप नेते सुनील देवधर यांच्यासह दिल्लीतील मान्यवर व्यक्ती व नागरिकांनी भेट देऊन मोदींना शुभेच्छा दिल्या.