प्रतिनिधी | मानस: केंद्रीय लोकसेवा आयोगाची फसवणूक करून आयएएस पद मिळवलेली आणि नंतर ते गमावलेली पूजा खेडकर पुन्हा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरले आहे तिचे कुटुंब.
नवी मुंबईतील एका अपघातानंतर ट्रक हेल्परचे अपहरण करून त्याला घरात डांबून ठेवल्याचा गंभीर आरोप पुजाचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर आहे. त्याला अटक करण्यासाठी पोलीस गेले असता, आई मनोरमा खेडकर हिने पोलिसांवर कुत्रे सोडले. त्यामुळे हे दोघेही सध्या पोलिसांच्या शोधात आहेत.
नवी मुंबई पोलिस दिलीप खेडकर यांचा तपास करत असून, मनोरमा खेडकरविरोधात चौकशी चतुर्श्रृंगी पोलिसांकडे सुरू आहे. पुण्यातील बाणेर रस्त्यावरील खेडकर यांच्या घरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक, महिला कर्मचारी यांसह मोठा ताफा दाखल झाला आहे.
पोलिसांना सहकार्य न केल्याने खेडकरांच्या घरावर नोटीस डकवण्यात आली होती. मात्र कुटुंबीयांनी ही नोटीस फाडून टाकली. तसेच अटकेसाठी गेलेल्या अधिकाऱ्यावर कुत्रा सोडण्यात आला होता. यानंतर पोलिसांची कारवाई आणखी कडक करण्यात आली आहे.
दरम्यान, खेडकरांच्या घरात दोन जेवणाचे डबे पोहोचले. गेट बंद असल्याने ते सुरक्षा भिंतीवर ठेवण्यात आले. काही वेळाने एक कर्मचारी येऊन ते डबे उचलून निघून गेला. त्यामुळे हे डबे नेमके कोणासाठी मागवले गेले? ते दिलीप आणि मनोरमा खेडकरांसाठीच होते का? असा संशय निर्माण झाला आहे.
👉 या घडामोडींमुळे खेडकर कुटुंबाच्या लपवाछपवीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.









