पुढील ३ तास धोक्याची, बाहेर फिरणे टाळा, हवामान विभागाचा मोठा इशारा

गेल्या दोन-तीन दिवसांपासून राज्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून, रात्रभर कोसळणाऱ्या पावसाने सकाळी अधिक तीव्र रूप धारण केले आहे. त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. पुढील काही तासांत अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

भारतीय हवामान विभागाने कोकणपट्टी आणि घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, रायगड, पुणे आणि कोल्हापूर येथे रेड अलर्ट आहे, तर मुंबई, ठाणे, परभणी, नांदेड, पालघर, छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

मुंबईत सलग तिसऱ्या दिवशी रात्रभर पाऊस झाला असून, अनेक भागांत 60 ते 100 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. हवामान खात्याने पुढील तीन तासांत मुंबई आणि रायगडमध्ये अतिवृष्टीची शक्यता व्यक्त केली आहे.

दरम्यान, जळगावच्या पारोळा तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला आहे. पळसखेडा गावाला जोडणारा पूल वाहून गेला असून अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. चिखलोड, म्हसवे आणि शेळावे गावांत चिखली नदीच्या पुराने घरांमध्ये व दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झाले आहे. शेतात पाणी शिरल्यामुळे उभे पीक वाहून गेले असून शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

अमरावती जिल्ह्यातील दोन दिवसांच्या पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे. पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे अप्पर वर्धा धरण आता 58 टक्के भरले आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणातून विसर्ग करण्यात आला होता.

➡️ राज्यात पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.