पुणे: पावसाळा तोंडावर आलेला असताना पुणे शहरातील पूरनियंत्रणासाठी प्रशासनाने नेमके कोणते नियोजन केले आहे, याची स्पष्टता आवश्यक आहे. मुळा-मुठा नदी सुधार प्रकल्पाच्या सुरू असलेल्या कामांमुळे नदीची वहनक्षमता कमी होत असून, त्यामुळे पुराचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकल्पामुळे अधिकृत सोसायट्या व घरांना फटका बसणार नाही, यासाठी प्रशासनाने विशेष खबरदारी घ्यावी, अशी मागणी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केली.
पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीत खासदार कुलकर्णी यांनी पुणे शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले. नदीपात्रातील भरावामुळे पावसाळ्यात पाणी सोसायट्यांमध्ये शिरण्याची भीती व्यक्त करत, दरवर्षी पुराचा फटका बसणाऱ्या वसाहतींसाठी प्रशासनाने ठोस कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी त्यांनी केली. नसरापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा, सार्वजनिक ठिकाणे, बसस्थानके तसेच गर्दीच्या भागांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी, अशी मागणी त्यांनी केली. सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध लागल्याचे उदाहरण समोर आले असल्याने महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी ही यंत्रणा प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तसेच सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टीने स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि अन्य मूलभूत सोयींसाठी निधी वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. ‘जेंडर बजेट’ अंतर्गत महिला व विद्यार्थिनींसाठीच्या सुरक्षाविषयक उपाययोजनांमध्ये वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली. पुणे शहर व ग्रामीण भागातील शासकीय जागांवरील अतिक्रमणांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. दर्गे, मजारी तसेच अन्य धार्मिक अतिक्रमणे आणि वक्फ नोंदींच्या संदर्भातील प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
जिल्ह्यातील युनेस्को वारसा स्थळे, गड-किल्ले आणि ऐतिहासिक वास्तूंवरील अतिक्रमणे रोखून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा, दुरुस्ती आणि विकासकामांसाठी वाढीव निधी उपलब्ध करून द्यावा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले. शहर आणि परिसरातील टेकड्या फोडण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी अवैध उत्खनन, बेकायदेशीर बांधकामे आणि पर्यावरणीय हानी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली.





