आजच्या शिक्षण व्यवस्थेकडे पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते — शिक्षणाचा मूळ हेतू कुठेतरी हरवत चालला आहे का? शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवणे, क्रमांक पटकावणे आणि यशाचे प्रदर्शन करणे एवढेच उरले आहे का? हा प्रश्न आज प्रत्येक पालक, शिक्षक आणि समाजाने गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे.
पूर्वी शिक्षण म्हणजे ज्ञान, संस्कार, विचारशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकास असे मानले जायचे. विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारावेत, नवे शोध घ्यावेत, स्वतःच्या मतांवर ठाम राहावे आणि आयुष्यातील समस्यांना सामोरे जाण्याची क्षमता विकसित करावी, हा शिक्षणाचा मूलभूत उद्देश होता. मात्र आज अनेक ठिकाणी शिक्षणाचा केंद्रबिंदू “गुण” झाला आहे. विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, क्षमता किंवा सर्जनशीलता मोजण्याऐवजी त्यांचे मूल्यांकन फक्त गुणपत्रिकेवर केले जात आहे.
आज परिस्थिती इतकी बदलली आहे की दुसरी-तिसरीतील विद्यार्थीही आत्मविश्वासाने सांगताना दिसतात — “Teacher ने दिलेले दहा प्रश्नच येणार आहेत.” एवढ्या लहान वयात विद्यार्थ्यांच्या मनात “ठराविक प्रश्न पाठ केले की परीक्षा सहज पास होऊ शकते” अशी मानसिकता निर्माण होणे हे अत्यंत चिंताजनक आहे. विद्यार्थ्यांना विषय समजून घेण्यापेक्षा “काय येणार?” याचीच अधिक उत्सुकता असते. ही मानसिकता केवळ विद्यार्थ्यांमध्ये नाही, तर पालक आणि काही प्रमाणात शिक्षकांमध्येही दिसून येते.
आज “महत्त्वाचे प्रश्न”, “आवर्जून विचारले जाणारे प्रश्न”, “शंभर टक्के हमखास प्रश्न” अशा संकल्पनांनी शिक्षण क्षेत्र व्यापले आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासक्रम समजून घेण्याऐवजी फक्त ठराविक प्रश्नसंच पाठ करण्याचा सल्ला दिला जातो. परीक्षेपूर्वी काही प्रश्न पाठ केले की चांगले गुण मिळतील, अशी धारणा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण केली जाते. यामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता, विश्लेषणशक्ती आणि आत्मविश्वास हळूहळू कमी होत जातो.
सध्या शिक्षण क्षेत्रात वाढत चाललेली ट्युशन संस्कृतीही चिंतेचा विषय आहे. काही शिक्षक शाळांमध्ये अध्यापन करत असतानाच खासगी शिकवण्या घेतात. अनेक वेळा विद्यार्थ्यांमध्ये अशी भावना निर्माण होते की शाळेपेक्षा ट्युशन अधिक महत्त्वाची आहे. काही ठिकाणी ट्युशन वर्ग आणि शाळांमध्ये अप्रत्यक्ष व्यावसायिक संबंध असल्याच्या चर्चाही ऐकायला मिळतात. शाळेत प्रवेश मिळवून देणे, निकाल चांगला दाखवणे किंवा विशिष्ट प्रश्नसंच पुरवणे या माध्यमातून शिक्षण क्षेत्र हळूहळू स्पर्धात्मक व्यवसायाच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसते.
यामध्ये सर्वात मोठा तोटा विद्यार्थ्यांचा होत आहे. कारण विद्यार्थी अभ्यास “समजून” घेण्याऐवजी “पाठ” करू लागतात. एखाद्या विषयामागील संकल्पना समजून घेण्यापेक्षा “परीक्षेत काय विचारले जाईल?” यावरच त्यांचा भर राहतो. परिणामी विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा कमी होते. प्रश्न विचारण्याची सवय कमी होते. नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता हरवते. केवळ परीक्षेपुरते शिक्षण घेणारी पिढी तयार होण्याचा धोका निर्माण होतो.
याहूनही गंभीर बाब म्हणजे मेहनतीपेक्षा शॉर्टकटला अधिक महत्त्व दिले जाऊ लागते. कमी वेळेत जास्त गुण मिळवण्याच्या मानसिकतेमुळे विद्यार्थ्यांमध्ये संयम, सातत्य आणि प्रामाणिक परिश्रम यांचे महत्त्व कमी होत आहे. प्रामाणिकपणे संपूर्ण अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना अनेकदा अन्याय झाल्यासारखे वाटते. कारण काही विद्यार्थी फक्त ठराविक प्रश्न पाठ करून अधिक गुण मिळवतात. यामुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासही डळमळीत होण्याची शक्यता आहे.
पालकांची भूमिकाही येथे महत्त्वाची ठरते. अनेक पालक आपल्या मुलांच्या क्षमतेपेक्षा त्यांच्या गुणांवर अधिक लक्ष केंद्रित करतात. “मुलाला किती गुण मिळाले?” हा प्रश्न आज “मुलाला काय समजले?” या प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचा बनला आहे. काही वेळा पालकांची अपेक्षा, तुलना आणि स्पर्धेचा दबाव विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण करतो. यामुळे अनेक विद्यार्थी अभ्यासाला आनंदाने न पाहता भीतीने पाहू लागतात.
शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठीचे साधन नाही. शिक्षण म्हणजे आयुष्य जगण्याची कला आहे. ते विद्यार्थ्याला चांगला माणूस बनवते. योग्य-अयोग्य यातील फरक समजावते. संकटांना सामोरे जाण्याची ताकद देते. समाजासाठी संवेदनशील बनवते. परंतु जर शिक्षण केवळ गुण, जाहिराती आणि निकाल यापुरते मर्यादित राहिले, तर भविष्यात ज्ञानापेक्षा फक्त प्रमाणपत्रांना महत्त्व मिळेल.
मी गेली पंधरा वर्षे शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहे. या काळात विद्यार्थ्यांमधील बदल, पालकांच्या अपेक्षा आणि शिक्षण पद्धतीतील बदल जवळून अनुभवले आहेत. आज विद्यार्थ्यांना सर्वात जास्त गरज आहे ती प्रेरणेची, समजून घेणाऱ्या शिक्षकांची आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या वातावरणाची. प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो. प्रत्येकाची शिकण्याची पद्धत वेगळी असते. म्हणूनच शिक्षण एकसारख्या चौकटीत मोजता येत नाही.
शिक्षकांची जबाबदारी फक्त अभ्यासक्रम पूर्ण करणे किंवा निकाल वाढवणे एवढीच नाही. विद्यार्थ्यांमध्ये विचार करण्याची क्षमता विकसित करणे, प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन देणे, अपयश स्वीकारण्याची ताकद निर्माण करणे आणि योग्य मूल्ये रुजवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला शिकले पाहिजे. “IMP Questions” वर नव्हे, तर स्वतःच्या ज्ञानावर आणि मेहनतीवर त्यांचा विश्वास असला पाहिजे.
आज शिक्षण व्यवस्थेला नव्याने विचार करण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांना फक्त परीक्षेसाठी नव्हे, तर आयुष्यासाठी तयार करण्याची आवश्यकता आहे. गुण महत्त्वाचे आहेत, पण तेच सर्वकाही नाहीत. कारण परीक्षेतील गुण काही क्षणांचा आनंद देतात, पण खरे शिक्षण आयुष्यभर व्यक्तिमत्त्व घडवत राहते.
विद्यार्थ्यांनी गुणांच्या शर्यतीत हरवून न जाता ज्ञानाच्या प्रवासात पुढे जावे, हीच आजच्या शिक्षण व्यवस्थेकडून अपेक्षा आहे.
वर्षा गोटे – संस्थापक – एक्सपर्टव्ह्यू अकॅडमी / एक्सपर्टव्ह्यू पूर्वप्राथमिक विद्यालय :





