पुणे, दि. ३० एप्रिल २०२६ : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनमधील (बीएनसीए) भूदृश्यकला विभागातर्फे सर्व उपलब्ध विद्याशाखांमधील पदवीधरांसाठी ‘निसर्गासोबत भूदृश्यकला’ (लॅण्डस्केप विथ नेचर) या विषयावरील पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू करण्यात येत आहे.
जागतिक भूदृश्यकला महिन्यानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात बीएनसीएचे प्राचार्य डॉ. अनुराग कश्यप यांनी या अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा केली. यावेळी प्रसिद्ध भूदृश्यकला वास्तूरचनाकार (लॅण्डस्केप आर्किटेक्ट) विकास भोसेकर, त्यांच्या पत्नी नीलिमा भोसेकर तसेच अमेय भोसेकर, मोहिनी भोसेकर, बीएनसीएतील भूदृश्यकला विभागप्रमूख डॉ. स्वाती सहस्रबुद्धे, प्रा. मुक्ता गोखले कुलकर्णी. प्रा. क्षितिजा कोल्हटकर, प्रा. स्नेहल मिजार आणि प्रा. अमृता बर्वे उपस्थित होते. यावेळी विकास भोसेकर यांनी त्यांच्या भूदृश्यकला या विषयावरील काही प्रकल्पाचे सादरीकरण केले. तसेच त्यांची मुलाखत डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांनी घेतली.
निसर्गासोबत भूदृश्यकला या पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमाची अधिकृत घोषणा करताना डॉ. कश्यप म्हणाले की, डॉ. स्वाती सहस्रबुद्धे यांच्या संकल्पकतेतून साकारलेला हा अभ्यासक्रम ही काळाजी गरज आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार हा अभ्यासक्रम कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखातील कोणत्याही पदवीधरासाठी उपयोगी असून भूदृश्यकला विषयातील तो एक मैलाचा दगड ठरतो आहे. भारतातून, परदेशातून या अभ्यासक्रमात कोणीही सहभागी होऊ शकणार असून तो ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र पद्धतीने (हायब्रीड) घेण्यात येणार आहे. त्यासाठी अनेक अनुभवी भूदृश्यकला वास्तूरचनाकार मार्गदर्शन करतील.
डॉ. स्वाती सहस्त्रबुद्धे म्हणाल्या की, हा अभ्यासक्रम केवळ सर्व वयोगटातील मुली व महिलांसाठी असून तो भारतरत्न महर्षी कर्वे यांच्या ‘शिक्षणातून महिलांचे सबलीकरण’ या तत्त्वाशी मेळ साधणारा आहे. या अभ्यासक्रमातून त्यांच्या शैक्षणिक प्रवासात त्यांना एक लवचिक, भक्कम पाठिंबा देणारे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. हा अभ्यासक्रम विभागवार पद्धतीने तयार करण्यात आला असून तो या विषयातील शिक्षणाच्या गरजेतून निर्माण झाला आहे. त्यामध्ये लवचिकता असून विविध विषयात शिरण्यासाठी व बाहेर पडण्यासाठी प्रवेश आणि बाहेर पडण्याची सोय असून शैक्षणिक पात्रतेनुसार गुणवत्ता ठरवली (क्रेडीट पॉईंट्स दिले) जाणार आहेत.
आपल्या प्रास्तविकात प्रा. मुक्ता गोखले कुलकर्णी म्हणाल्या की, हा अभ्यासक्रम एका मूलभूत विचारमंथन आणि गरजेतून तयार करण्यात आला आहे. भूशास्त्रकला हा विषय मुळात प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत, संबंधित आणि समावेशक असा आहे. भूदृश्यकला हा केवळ एक अभ्यासविषय नसून तो जगण्यातील निर्माण होत जाणारा एक अनुभव आहे. जगण्यातील या अनुभूतीचा प्रत्यंतर आणि सखोल समज या अभ्यासक्रमातून मोठ्या प्रमाणात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्यांपर्यंत पोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
या अभ्यासक्रमात पर्यावरण आणि शाश्वतता या पायावर भर देण्यात येणार असून अनुभव देणाऱ्या विविध कार्यशाळा आणि प्रत्यक्ष भेटींचे आयोजन करण्यात येत आहे. तसेच निसर्ग व निसर्गावर आधारित विविध प्रश्नांची उत्तरे यावर भर देण्यात येणार आहे. यासाठी लागणारे संदर्भ साहित्य व सचित्र माहिती तसेच यावरील दस्ताऐवजीकरण करण्यासाठी कौशल्य निर्माण करणारे शिक्षण दिले जाईल.याचा उपयोग विविध उद्योग तसेच पर्यावरणीय सल्ला देणाऱ्या संस्थांमध्ये होऊ शकेल.
विकास भोसेकर यांनी या अभ्यासक्रमाचे स्वागत केले असून आपणही त्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. मुलाखतीत बोलताना ते म्हणाले की, भूदृश्यकला हा एक माणसाला उदात्ततेकडे नेणारा व्यवसाय असून तो थेट निसर्ग व पर्यावरणाशी जोडला गेला आहे. यातून निसर्गाविषयी अनेक गोष्टी शिकता येतात. आपण अद्याप विद्यार्थी आहोत ही विनम्रता निर्माण होते. भूदृश्यकला या विषयात देश पातळीवर काही सकारात्मक बदल घडताहेत. रेल्वे, विमानतळ आणि नदीसुधार अशा विविध प्रकल्पांना चालना मिळत आहे.
भूदृश्यकलेतून विकास व निसर्ग यांची अर्थपूर्ण जोडणी करणे शक्य आहे. बीएनसीएतील भूदृश्यकला पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम हा त्या अर्थाने उपयुक्त ठरेल, असा विश्वास वाटतो.





