मोठी बातमी । १ मे पासून रिक्षा-टॅक्सी बाबत नवा नियम लागू होणार
महाराष्ट्राची राजधानी मुंबईमध्ये रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या १ मे महाराष्ट्र दिनापासून या नियमाची कडक अंमलबजावणी करण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्या चालकांवर कठोर कारवाई केली जाणार आहे.
मुंबईसारख्या महानगरात देशाच्या विविध भागांतून नागरिक रोजगारासाठी येतात. मात्र, राज्यभाषा असलेल्या मराठीकडे दुर्लक्ष केल्याच्या तक्रारी सातत्याने पुढे येत होत्या. काही रिक्षा व टॅक्सी चालक मराठी समजूनही बोलण्यास नकार देतात, अशी प्रवाशांची नाराजी वाढत होती. यापूर्वी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या एका रिक्षाचालकाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हा मुद्दा अधिक चर्चेत आला होता.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक कार्यालयांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. यामध्ये चालकांना मराठी वाचता आणि लिहिता येते का, याची पडताळणी केली जाईल. मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या चालकांचे परवाने रद्द करण्यात येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, रिक्षा व टॅक्सी चालकांना परवाना देताना स्थानिक भाषेचे ज्ञान असणे हा नियम पूर्वीपासून अस्तित्वात आहे. मात्र, मुंबई महानगर क्षेत्र, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये अनेक चालकांना मराठीत संवाद साधता येत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात प्राप्त झाल्या आहेत.
“ज्या राज्यात आपण व्यवसाय करतो, त्या राज्याच्या भाषेचा आदर करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे १ मेपासून सर्व परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठी भाषा वाचता व लिहिता येणे बंधनकारक असेल,” असे त्यांनी सांगितले.
तसेच, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांचे परवाने रद्द करण्यासोबतच नियमांकडे दुर्लक्ष करून परवाने देणाऱ्या परिवहन अधिकाऱ्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.





