मंगला सिनेमागृहाबाहेर कामगारांचे धरणे आंदोलन; मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा

By: Editor_Manas

On: Tuesday, March 17, 2026 1:26 PM

Google News
Follow Us

पुणे : मंगला सिनेमागृहातील कामगारांच्या वेतनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दलाच्या वतीने मंगला सिनेमागृहाबाहेर जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले. भगवानराव वैराट यांच्या अध्यक्षतेखाली हे आंदोलन पार पडले. कामगारांच्या हक्कांसाठी मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मंगला सिनेमागृहातील कामगारांच्या वेतनवाढी व इतर मागण्यांसंदर्भात महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल आणि सिनेमागृह व्यवस्थापन यांच्यात १ नोव्हेंबर २०२३ रोजी करारनामा झाला होता. मात्र त्या करारातील अटी व शर्तींची अंमलबजावणी व्यवस्थापनाकडून अद्याप करण्यात आलेली नाही. करारानुसार पगारवाढ व इतर सुविधा देण्याकडे व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला.

यावेळी संघटनेच्या वतीने व्यवस्थापनावर आणखी काही गंभीर आरोपही करण्यात आले. काही कामगारांकडून जबरदस्तीने राजीनामे घेतले जात असल्याची तक्रार संघटनेने केली असून हे गैरकृत्य तात्काळ थांबवावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच कामगारांवर दबाव टाकून संघटनेतून बाहेर पडण्यास भाग पाडले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याबाबत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.

कोरोना महामारीच्या काळात आर्थिक अडचणींचे कारण देत अनेक कामगारांना ज्येष्ठता यादी डावलून बेकायदेशीररीत्या कामावरून कमी करण्यात आल्याचा मुद्दाही आंदोलनात उपस्थित करण्यात आला. त्या सर्व कामगारांना पुन्हा सेवेत घ्यावे, तसेच १ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेला करारनामा तात्काळ लागू करून थकीत रक्कम कामगारांना द्यावी, अशी प्रमुख मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली.

दरम्यान, व्यवस्थापनाने कामगारांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य केल्या नाहीत, तर पुढील काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि न्याय मिळविण्यासाठी बेमुदत उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

याप्रसंगी काशिनाथराव गायकवाड, हरिभाऊ वाघमारे, मोहम्मद शेख, दत्ताजी डाडर, प्रदीप पवार, सुनिता अडसुळे गणेश लांडगे सुरेखा भालेराव, अरुणा तांगडे, वैशाली अवघडे, वंदना पवार, संतोष कदम, श्रीनिवास आखाडे, भाऊ कसबे, मधुकर गायसमुद्रे, संजय बंडे,भीमाप्पा कोळी, वैशाली धाराशिवकर, सिद्धाप्पा बिराजदार, फकीरा दास, प्रमिला ठोंबरे, नाना थोरात, वामन कदम, चंद्रकांत कांबळे आदी उपस्थितीत होते.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Related News

September 26, 2026

September 24, 2026

September 23, 2026

September 22, 2026

September 20, 2026

September 16, 2026