सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह्ज व टाटा ऑटोकॉम्पच्या पुढाकाराने

By: Editor_Manas

On: Saturday, March 28, 2026 9:18 AM

Google News
Follow Us

पुणे: पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शाळांना पर्यावरणपूरक बनविण्याच्या उद्देशाने टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर निधीतून आणि सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हज यांच्या माध्यमातून चार जिल्हा परिषद शाळांमध्ये ग्रीन स्कूल प्रकल्पाचे लोकार्पण नुकतेच झाले. खेड तालुक्यातील बिरदवाडी, देशमुखवाडी, तोरणे आणि रानमळा (कडूस) येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून शाळांमध्ये पर्यावरणपूरक पायाभूत सुविधा निर्माण करून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण, ऊर्जा बचत आणि शाश्वत जीवनशैली याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या ग्रीन स्कूल प्रकल्पांतर्गत शाळांमध्ये सोलर ऊर्जा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग व्यवस्था, ओल्या कचऱ्यासाठी खत निर्मिती यंत्र, तसेच इनडोअर व आउटडोअर वृक्षारोपण करण्यात आले आहे. पाणी संवर्धनासाठी शाळांमध्ये लो-फ्लो वॉटर टॅप्स बसविण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वर्षभर पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यासाठी ग्रीन कॅलेंडर शाळांना देण्यात आले आहे. शाळेतील सर्व हरित उपक्रमांची देखभाल व अंमलबजावणी करण्यासाठी विद्यार्थ्यांची ‘ग्रीन आर्मी’ तयार आहे. विद्यार्थ्यांना विज्ञान व पर्यावरण विषयाची आवड निर्माण व्हावी यासाठी सायन्स पार्क भेट, तसेच पर्यावरण संवर्धन, अग्निसुरक्षा आणि जैवविविधता ओळख या विषयांवर मार्गदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या.

सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हजच्या अपूर्वा कुलकर्णी म्हणाल्या, “पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आमची संस्था नेहमीच पुढाकार घेत असते. शासकीय शाळांना हरित शाळांमध्ये रूपांतरित करण्याच्या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात झाली. टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सीएसआर निधीच्या सहकार्याने आतापर्यंत ८ शाळांमध्ये ग्रीन स्कूल प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आले आहेत.”

या प्रकल्पामुळे शाळांमध्ये नैसर्गिक ऊर्जेचा वापर वाढेल, पावसाचे पाणी जमिनीत मुरल्यामुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होईल, तसेच लो-फ्लो टॅप्समुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत होईल. वृक्षारोपणामुळे शाळा परिसर अधिक हरित होऊन विद्यार्थ्यांना स्वच्छ व पर्यावरणपूरक वातावरण मिळेल, असे अमोल उंबरजे यांनी सांगितले. 

शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षकांनी या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबाबत जागरूकता वाढेल आणि उपलब्ध सुविधांचा योग्य वापर केला जाईल, असा विश्वास व्यक्त केला. तसेच चारही गावांतील ग्रामस्थ व पालकांनी टाटा ऑटोकॉम्प सिस्टिम्स आणि सस्टेनाबिलिटी इनिशिएटिव्हज यांच्या उपक्रमाचे कौतुक करत आभार मानले.

या प्रकल्पाचे समन्वयक म्हणून प्रियांका बुरंगे, सुमित कापसे आणि शालीन पालेकर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now