‘क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्स’तर्फे २१ मार्चला एकल पालक संमेलन

By: Editor_Manas

On: Wednesday, March 11, 2026 4:50 PM

Google News
Follow Us

पुणे, ता. ११ : एकट्याने पालकत्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या आई-वडिलांना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळावे, यासाठी क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रिब्युटर्सतर्फे एकल पालक दिनानिमित्त २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता पुण्यातील दादासाहेब दरोडे सभागृह, बीएमसीसी रस्ता येथे एकल पालक संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संस्थेचे संचालक भूषण वाणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कौटुंबिक न्यायालयातील ज्येष्ठ समुपदेशिका डॉ. स्मिता प्रकाश जोशी उपस्थित होत्या.

हे संमेलन यंदा तिसऱ्या वर्षी आयोजित केले जात आहे. एकट्याने पालकत्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या पालकांना एकत्र आणून त्यांना प्रेरणा देणे आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच त्यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासात सकारात्मक अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी आणि आनंदाचा क्षण साजरा करण्यासाठीही हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे.

या संमेलनात ‘एकल पालकत्व’ या विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन, मनोरंजनाचे कार्यक्रम तसेच आर्थिक नियोजनाविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. यंदा मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकर आणि दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुवेंद्र महाजन यांचे विशेष मार्गदर्शन सत्र होणार आहे. तसेच डॉ. स्मिता जोशी कौटुंबिक नातेसंबंधांवर मार्गदर्शन करणार असून भूषण वाणी आर्थिक नियोजनावर व्याख्यान देणार आहेत.

संमेलनादरम्यान लहान मुलांसाठी स्वतंत्र जागेत मनोरंजनात्मक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, योग्य नियोजनासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे.

याबाबत बोलताना भूषण वाणी म्हणाले, “पालकत्व ही आनंदाची जबाबदारी असली तरी ती एकट्या आई किंवा वडिलांवर येते तेव्हा आव्हान अनेक पटींनी वाढते. अशा पालकांचे कौतुक करण्याबरोबरच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि आधार मिळावा, यासाठी हे संमेलन आयोजित केले आहे. एकल पालकांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे. एकमेकांना भेटून अनुभव शेअर केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि पालकत्व अधिक सक्षमपणे निभावता येते.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now