शौर्य पुरस्कारार्थींच्या मानधनवाढीसाठी प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांचा पुढाकार

By: Editor_Manas

On: Wednesday, March 11, 2026 4:39 PM

Google News
Follow Us

पुणे : शौर्य पुरस्कारप्राप्त माजी सैनिकांच्या मासिक मानधनात वाढ करावी, पुणे कॅंटोन्मेंटमधील संरक्षण खात्याच्या जमिनींचे रक्षण व्हावे, त्याठिकाणी अनधिकृत बांधकाम होऊ नये, मोडकळीस आलेल्या मालमत्तांची दुरुस्ती करावी, अशा विविध मागण्यांसाठी राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे केली. यासंदर्भात राजनाथ सिंह यांना निवेदन देत त्यांनी सविस्तर चर्चा केली.

प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, “निवृत्त मेजर व वीरचक्र पुरस्कार विजेते उदय साठे यांच्याद्वारे प्राप्त झालेल्या निवेदनाच्या आधारे शौर्य पुरस्कारार्थींसाठी देण्यात येणाऱ्या मानधनाचा पुनर्विचार करण्याची गरज भारतीय राजपत्रानुसार परमवीरचक्र, महावीरचक्र आणि वीरचक्र प्राप्त सैनिकांसाठी ‘विशेष पेन्शन’ची तरतूद असली, तरी ती पूर्णपणे अंमलात आलेली नाही, असे साठे यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे.”

सध्या या शौर्य पुरस्कारार्थींना देण्यात येणाऱ्या मासिक मानधनात २०१८ मध्ये सुधारणा करण्यात आली होती. मात्र, वाढत्या जीवनावश्यक खर्च आणि वैद्यकीय खर्चाच्या पार्श्वभूमीवर हे मानधन अपुरे ठरत असल्याची भावना अनेक माजी सैनिकांनी व्यक्त केली आहे. ही बाब लक्षात घेऊन मानधनात वाढ करावी. परमवीरचक्रधारकांना दरमहा १.२५ लाख रुपये, महावीरचक्रधारकांना १.१५ लाख रुपये आणि वीरचक्रधारकांना १.०५ लाख रुपये मानधन देण्याचा प्रस्ताव माजी मेजर साठे यांनी मांडला आहे. देशासाठी शौर्य दाखविणाऱ्या या वीरांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

या विषयावर सविस्तर चर्चा करण्यासाठी माजी मेजर साठे यांना संरक्षण मंत्र्यांची भेट मिळावी, अशी विनंतीही खासदार कुलकर्णी यांनी केली आहे. शौर्य पुरस्कारधारकांचा सन्मान त्यांच्या हयातीत ठोस स्वरूपात व्हावा, या दृष्टीने या प्रस्तावाला प्राधान्याने सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यासह पुणे कॅंटोन्मेंटमधील विविध जागांच्या संदर्भात लक्ष घालून नियमितता आणावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now