पीआयबीएमचा १६ वा दीक्षांत समारंभ उत्साहात; ७०४ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

पुणे, मार्च २०२६ : पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम) येथे संस्थेचा १६ वा दीक्षांत समारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला. भारत सरकारचे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री राज भूषण चौधरी हे विशेष अतिथी म्हणून कार्यक्रमास उपस्थित होते. यावेळी चॉईस एएमसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीष जैन, ग्रॅण्ट थॉर्नटन भारत एलएलपीचे भागीदार अंकित चुग, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, मुबिया इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक कवलदीप सिंग आणि शॉपर्स स्टॉपचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी कवींद्र मिश्रा यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पीआयबीएमचे अध्यक्ष रमणप्रीत यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.

या वेळी बोलताना संजय सेठ यांनी सांगितले की, भारत स्वातंत्र्याच्या १०० वर्षांच्या दिशेने म्हणजे २०४७ कडे वाटचाल करत असताना आजची तरुण पिढी विकसित भारताची खरी ब्रँड ॲम्बेसेडर ठरणार आहे. भारतातील ३० वर्षांखालील ६० कोटींहून अधिक तरुण ही देशाची मोठी ताकद असून त्यांच्यातील ऊर्जा आणि नवकल्पना देशाच्या प्रगतीस गती देत आहेत.

दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) परिषदेमुळे एआयमुळे नोकऱ्या कमी होतील ही भीती दूर करण्यास मदत झाली. कृत्रिम बुद्धिमत्ता भारताच्या भविष्यास आकार देण्यात आणि जागतिक स्तरावर देशाची प्रतिमा अधिक मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असे त्यांनी नमूद केले. आरोग्यसेवा, शेती, शहरी व्यवस्थापन आणि वाहतूक व्यवस्था अशा अनेक क्षेत्रांमध्ये एआय मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

पीआयबीएमचे अध्यक्ष रमणप्रीत यांनी सांगितले की, कौशल्याधारित शिक्षणामुळे रोजगाराच्या संधी वाढतात आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता मजबूत होते. स्पष्ट ध्येय, शिस्तबद्ध विचार आणि चिकाटी यामुळे तरुणांना यश मिळवणे शक्य होते. कठोर परिश्रम आणि दृढ इच्छाशक्तीच्या बळावर केवळ वैयक्तिक यशच नव्हे तर समाजालाही सकारात्मक दिशा देता येते.

या दीक्षांत समारंभात बिझनेस ॲनालिटिक्स, एचआर, फायनान्स, मार्केटिंग, एचआर ॲनालिटिक्स, मार्केटिंग ॲनालिटिक्स आणि मार्केटिंग ऑपरेशन्स या अभ्यासक्रमांतील एकूण ७०४ विद्यार्थ्यांना पीजीडीएम पदवी प्रदान करण्यात आली.