टी-२० विश्वचषक अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर ₹१०,००० कोटींच्या अवैध सट्टेबाजी प्रकरणाची चौकशीची मागणी

नागपूर / पणजी : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे होत असलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुमारे ₹१०,००० कोटींच्या अवैध सट्टेबाजी रॅकेट चालू असल्याचे वृत्त समोर आले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक (SIT) मार्फत उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.

पणजी येथील रायबंदरचे सजग नागरिक दिलीप शेटये यांनी या संदर्भात पणजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. नागपूरमध्येही एका नागरिकाने ई-मेलद्वारे अशीच तक्रार नोंदवली असून हिंदू जनजागृती समितीने या तक्रारींना पाठिंबा दर्शविला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अत्याधुनिक मोबाईल अ‍ॅप्स आणि परदेशातील सर्व्हरच्या माध्यमातून हे सट्टेबाजी रॅकेट कार्यरत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. काही प्रमुख वृत्तपत्रांनीही या कथित सट्टेबाजी जाळ्याबाबत वृत्त प्रसिद्ध केले असून प्रशासनाने त्याची स्वतःहून दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी ‘सुराज्य अभियान’ने केली आहे.

या संदर्भात ‘सुराज्य अभियान’ने म्हटले आहे की, क्रिकेटच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर होणारी अवैध सट्टेबाजी भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा आणि भारतीय क्रिकेटची विश्वासार्हता धोक्यात आणत आहे. अशा प्रकारच्या जुगाराच्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या प्रमुख घटकांबाबत तपास यंत्रणांना माहिती असते, त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.

संस्थेने प्रशासनाला आवाहन केले आहे की, या प्रकरणाशी संबंधित वृत्त प्रकाशित करणाऱ्या माध्यमांशी संपर्क साधून माहितीची पडताळणी करावी आणि सट्टेबाजीच्या नियंत्रण केंद्रांवर तातडीने कारवाई करावी. जप्त करण्यात आलेली रक्कम सार्वजनिक हिताच्या योजनांसाठी वापरावी.

केंद्र सरकारने मंजूर केलेल्या ‘ऑनलाईन गेमिंग कायदा २०२५’ नुसार अवैध सट्टेबाजी आणि त्यास मदत करणे हा अजामीनपात्र गुन्हा असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच अंमलबजावणी संचालनालय (ED) आणि सायबर गुन्हे शाखेने हवाला व्यवहार आणि डिजिटल पेमेंट गेटवे बंद करण्यासाठी कारवाई करावी, असेही सांगण्यात आले आहे.

“विश्वचषक अंतिम सामना संपण्यापूर्वीच या सट्टेबाजी रॅकेटविरोधात देशांतर्गत ‘सर्जिकल स्ट्राइक’ करणे आवश्यक आहे, जेणेकरून भारत आणि भारतीय क्रिकेटची प्रतिमा जगभरात मलिन होणार नाही,” असेही सुराज्य अभियानने नमूद केले आहे. संस्थेने या प्रकरणावर पुढेही लक्ष ठेवण्याची भूमिका जाहीर केली आहे.