बांबू उद्योगाच्या प्रगतीसाठी सहकार क्षेत्राची जोड आवश्यक

By: Editor_Manas

On: Monday, March 9, 2026 7:46 AM

Google News
Follow Us

पुणे: ग्रामीण अर्थव्यवस्थेत परिवर्तन करण्याची क्षमता असलेले बांबू हे जादुई पीक आहे. शाश्वत उद्योग म्हणून बांबूकडे पाहायला हवे. या उद्योगाला सहकार क्षेत्राची आणि संस्थात्मक धोरणाची जोड मिळाली, तर बांबू उद्योग झपाट्याने विकसित होईल,” असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले. बांबूची लागवड वाढत असून, त्याला संस्थात्मक रूप दिल्यास बांबूच्या क्षमतेचा पूर्ण वापर होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला उभारी मिळेल, असेही त्यांनी नमूद केले.

डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचालित इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चच्या (आयएमडीआर) वतीने ‘सहकार चळवळीत बांबू : शाश्वतता आणि समृद्धीची जडणघडण’ तसेच ‘डेटाच्या आधारे नेतृत्व : धोरणे, नवकल्पना आणि प्रभाव’ या विषयांवर आंतरराष्ट्रीय परिषद आणि ‘बांबूकॉन’ प्रदर्शनाच्या समारोपावेळी सुरेश प्रभू बोलत होते. प्रसंगी संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभू यांनी बांबू प्रदर्शनाला भेट देत उत्पादकांचे कौतुक केले व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

सुरेश प्रभू म्हणाले, “पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रीमंडळात पर्यावरणमंत्री असताना बांबू लागवडीला १९९८मध्ये देशात पहिल्यांदाच चालना दिली. देशाचे पर्यावरण आणि अर्थव्यवस्था बदलण्याची क्षमता बांबूमध्ये आहे. भारतात ८०-९० टक्के लोक सहकाराशी संबंधित आहेत. सहकाराच्या अनेक यशोगाथा आहेत. महाराष्ट्रात सहकाराच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक प्रगतीची अनेक उदाहरणे आहेत. महाराष्ट्रात ऊस शेतकऱ्यांना सहकारामुळे पैसा मिळू लागला. तसेच हिमाचल प्रदेशात सफरचंदाच्या बाबतीत झाले. अमूलसारखा ब्रँड निर्माण झाला. आता तर आईच्या दुधाची बँक तयार झाली आहे. सहकारातील चांगल्या उदाहरणांच्या धर्तीवर आता बांबूमध्येही चांगले प्रयोग करण्याचा विचार केला पाहिजे.”

बांबू केवळ एक पीक नसून, तो भविष्यातील एक मोठा उद्योग असल्याचे सांगून प्रभू म्हणाले, “ग्रामीण भाग, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात परिवर्तन घडवण्याची क्षमता सहकारात आहे. ऊसाचे माती आणि पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होतात, तर बांबूचे सकारात्मक परिणाम होतात. बांबूच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जन कमी होण्यास मदत होते, त्यामुळे हरित अर्थव्यवस्था उभारणीतही बांबूचा हातभार लागतो. त्यामुळे बांबूसह शेतीविषयक उत्पदनांना सहकाराची जोड देणे गरजेचे आहे.”

सहकारातून निर्माण होणारी संपत्ती सदस्यांच्या हाती जाते, हा सहकाराचा फायदा आहे. त्यामुळे सहकारी संस्थेच्या माध्यमातून उत्तम डिझाइन, उत्पादने बांबूपासून विकसित केल्यास त्याचे विपणन, विक्री, निर्यात करता येऊ शकते. त्याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो. सहकार क्षेत्र बांबूसाठी गेमचेंजर ठरू शकते, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now