यशवंतराव चव्हाण जयंतीनिमित्त ४०वे कवी संमेलन व कला-साहित्य पुरस्कार सोहळा

By: Editor_Manas

On: Monday, March 9, 2026 7:59 AM

Google News
Follow Us

पुणे : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ४०वे कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम गुरुवार, १२ मार्च रोजी रात्री ८.३० वाजता पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे होणार आहे.

या सोहळ्यात ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांना ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रानमाणूस प्रसाद गावडे यांना प्रथमच दिला जाणारा ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’ जाहीर झाला आहे. या दोन्ही पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी ५० हजार रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते, ज्येष्ठ नाट्यअभिनेते सतीश आळेकर आणि पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण होणार आहे. ही माहिती ट्रस्टचे संयोजक संजय ढेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी गौरव फुटाणे, कुणाल जाधव, कवी भरत दौंडकर, कवयित्री अंजली कुलकर्णी आणि सुनील महाजन उपस्थित होते.

यावर्षी यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (काव्यसंग्रह – विस्मरणाच्या आरण्यात), चंद्रपूरचे अविनाश पोइनकर (दंडकारूण्य) आणि नाशिकच्या प्रतिभा पवार-खैरनार (वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना प्रदान करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी ११,००१ रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे आहे.

कार्यक्रमात आयोजित कवी संमेलनात राज्यभरातील नामवंत कवी सहभागी होणार आहेत. यात अशोक नायगावकर, महेश केळुसकर, वैशाली पतंगे, यामिनी दळवी, प्रशांत मोरे, कल्पना दुधाळ, मधुरा उमरीकर, अविनाश कोठावडे, अरुण पवार, भरत दौंडकर, अंजली कुलकर्णी, अनिल दीक्षित, शशिकांत तिरोडकर आणि गुंजन पाटील यांचा समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे करणार आहेत.

प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट आणि गंगा लॉज मित्र मंडळ यांचा हा उपक्रम गेल्या चार दशकांपासून साहित्य व कला क्षेत्रातील मानबिंदू ठरत असून ४०व्या वर्षात हा सोहळा अधिक भव्य आणि संस्मरणीय करण्याचा संकल्प ट्रस्टने केला असल्याचे गौरव फुटाणे यांनी सांगितले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now