सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीचा ‘ल क्लासे’ फॅशन शो : ‘शाश्वत भारत’चे दर्शन

By: Editor_Manas

On: Sunday, February 22, 2026 1:26 PM

Google News
Follow Us

पुणे: सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या (एसआयएफटी) वतीने आयोजित केलेल्या ‘ल क्लासे’ या वार्षिक फॅशन शोमधून ‘शाश्वत भारत’ संकल्पनेचे दर्शन घडले. ‘शाश्वत भविष्याकरिता भारतीय संस्कृती, परंपरा, कला आणि नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करणे ही प्रत्येक मानवाची प्राथमिक जबाबदारी आहे,’ असे प्रतिपादन ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी केले.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एसआयएफटी’च्या प्राचार्या डॉ. सायली पांडे यांच्या पुढाकाराने ‘शाश्वत भारत’ या संकल्पनेवर आधारित यंदाचा फॅशन शो झाला. आधुनिक फॅशनच्या रूपात विद्यार्थ्यांनी सहजपणे भारताच्या सांस्कृतिक मुळांचा, पारंपरिक हस्तकलेचा आणि शाश्वत डिझाइन तत्त्वज्ञानाचा साकारलेला प्रभावी आविष्कार या फॅशन शोमध्ये सादर झाला. एकूण सहा वैशिष्ट्यपूर्ण सत्रांमधून फॅशनची ही कहाणी उलगडली. प्रत्येक सत्रामध्ये शाश्वतता, वारसा आणि जबाबदार डिझाइनचा वेध घेतला गेला.

उद्घाटनाच्या ‘भूमी आणि तंतू – द सॉईल ऑफ द लँड’ या सत्रामध्ये खादी, सेंद्रिय कापूस, भांग (हेम्प), लिनन आणि अहिंसा सिल्क यांसारख्या भारतातील पारंपरिक नैसर्गिक तंतूंना अभिवादन करण्यात आले. कमी पर्यावरणीय परिणाम करणारे साहित्य, नैसर्गिक पोत आणि श्वास घेणारी विण यांवर भर देत या संग्रहात प्रिंट्सपेक्षा कापडाच्या रचनेवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. मृदू मातीसारखे रंग आणि ऑफ-व्हाईट छटा शुद्धता, अस्सलता आणि भूमी-डिझाइनमधील घट्ट नातेसंबंधाचे प्रतीक म्हणून उभ्या राहिल्या.  

‘सूर्यशक्ती’ (सोलर स्पिंडल) या दुसऱ्या सत्रात सूर्याच्या शाश्वत ऊर्जेपासून आणि चरख्याच्या लयबद्ध हालचालीपासून प्रेरणा घेत, भारतीय तत्त्वज्ञानाशी निगडित या संग्रहाने सजीवपणा, हालचाल आणि नवचैतन्याचे दर्शन घडवले. प्रवाही सिलोएट्स, हस्तनिर्मित पोत आणि गतिमान पृष्ठभाग अलंकरणाच्या माध्यमातून जीवनशक्ती म्हणून ऊर्जेचा गौरव करण्यात आला.

‘हस्तकला- द आर्ट ऑफ हॅन्ड्स’मधून भारताच्या समृद्ध हस्तकला परंपरेचा उत्सव साजरा झाला. ‘शाश्वत भारत’ या संकल्पनेचा वेध घेत या संग्रहात कलमकारीसारख्या पारंपरिक वस्त्रांसह भरतकाम, पेंटिंग आणि अरी (झरदोसी) यांसारख्या पारंपरिक अलंकरण तंत्रांना अधोरेखित करण्यात आले. स्ट्रक्चर्ड ब्लेझर्स आणि टेलर्ड ट्राउझर्समुळे आधुनिकता जाणवली, तर टील ग्रीन, मातीसारखे कलमकारी रंग, मेटॅलिक अ‍ॅक्सेंट्स आणि ऑफ-व्हाईट छटा सांस्कृतिक सातत्य आणि स्लो फॅशन मूल्यांना अधोरेखित केले.

‘धरोहर’ या चौथ्या सत्रांतून भारताच्या वस्त्रपरंपरेचे जतन आणि संवर्धन यावर केंद्रित होते. पैठणी, बनारसी, महेश्वरी, कांचीवरम, पटोला आणि ब्रोकेड्स यांसारख्या पारंपरिक हातमाग वस्त्रांना आधुनिक सिलोएट्सद्वारे नव्या रूपात सादर करण्यात आले. मुघल ग्रीन, लाल, आयव्हरी, सोनेरी, विटकरी लाल आणि जांभळ्या अशा समृद्ध रंगछटांच्या वापरातून या संग्रहाने वारसा आणि शाश्वतता यांची सांगड घातली.

निसर्गप्रेरित कथनातून वस्त्र रंगवण्याच्या कलेचा उत्सव असलेल्या पाचव्या ‘रंगरेज’ या सत्रात टाय-अँड-डाय, शिबोरी आणि बटिक यांसारख्या पारंपरिक रंगकाम तंत्रांना नैसर्गिक व सेंद्रिय रंगांच्या माध्यमातून पुनरुज्जीवित करत या संग्रहाने परिवर्तन, संतुलन आणि सहअस्तित्वाचे प्रतीक साकारले. सिलोएट्स आणि हस्तनिर्मित प्रक्रियांद्वारे ‘रंगरेज’ने पर्यावरणीय जबाबदारी आणि निसर्गाशी सुसंवादाचा प्रभावी संदेश दिला.

‘मिट्टी अँड मोअर’ या समारोपाच्या सत्रात भारतीय मातीचा गाभा आणि मुळांशी असलेली भावनिक नाळ प्रतिबिंबित झाली. कापूस, लिनन आणि उरलेल्या कापडांचा वापर करून या संग्रहाने पुनर्वापर, कमी कचरा आणि योग्य विनियोग यांना प्रोत्साहन दिले. मातीसारखी पोत आणि ब्राऊन, बेज, ऑफ-व्हाईट व मस्क ग्रीन अशा शांत रंगसंगतीमुळे परंपरा आणि आधुनिक शाश्वततेचा सुसंवादी, नैसर्गिक आविष्कार साकारला.

प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, सुषमा चोरडिया यांच्यासह ‘सूर्यदत्त’च्या सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा, सूर्यदत्त समूहातील विविध संस्थांचे प्रमुख, पालक, विद्यार्थी आणि निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिझाईनर संदीप नवलखा, ब्युटिशियन शीतल जैन आणि मॉडेल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या संचालिका रंजना सिंग यांनी शोचे परीक्षण केले. मेकअपसाठी ‘व्हीएलसीसी’चे सहकार्य लाभले. अमृता पानसे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सायली पांडे यांनी आभार मानले. 

तिन्ही गटांच्या सहभागाने रंगलेल्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेने कार्यक्रमात अधिक उत्साह निर्माण केला. या स्पर्धेत गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज, पुणे यांनी विजेतेपद पटकावले. कार्यक्रमातील विशेष आकर्षण ठरले ते किड्स राऊंड. सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी ‘भूमी आणि तंतू’ या संकल्पनेवर आधारित पोशाख परिधान करून आत्मविश्वासाने रॅम्पवॉक करीत उपस्थितांची मने जिंकली. सुषमा चोरडिया यांनी ‘धरोहर’ संकल्पनेवर डिझाइन केलेला पोशाख परिधान करून सादरीकरण केले. प्रा. मोनिका कर्वे व प्रा. शिखा सारडा यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी सर्व पोशाख तयार केले. प्रा. अखिला मुरमट्टी, प्रा. खुशबू गजबी, ग्रंथपाल छाया माने, धनश्री पिसे यांनी समन्वयन केले.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now