‘आयसीएआय’ पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रणव आपटे यांची निवड

By: Editor_Manas

On: Tuesday, February 24, 2026 11:43 AM

Google News
Follow Us

पुणे : दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) पुणे शाखेच्या अध्यक्षपदी सीए प्रणव आपटे यांची निवड झाली. उपाध्यक्षपदी सीए निलेश येवलेकर, सचिवपदी सीए नेहा फडके, खजिनदारपदी सीए नंदकुमार कदम यांची, तर ‘विकासा’ या विद्यार्थी शाखेच्या अध्यक्षपदी सीए सारिका दिंडोकार यांची निवड झाली आहे. २०२६-२०२७ या वर्षासाठी नव्या कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष सीए प्रणव आपटे यांनी मावळते अध्यक्ष सीए सचिन मिणियार यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यकारिणी सदस्य म्हणून सीए सचिन मिणियार, सीए हृषीकेश बडवे, सीए प्रितेश मुनोत, सीए प्रज्ञा बंब काम पाहतील.

यावेळी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, विभागीय समिती सदस्य सीए राजेश अग्रवाल, सीए रेखा धामणकर व सीए अभिषेक धामणे आदी उपस्थित होते. आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन केले. सीए सचिन मिणियार यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या कामांविषयी, राबविलेल्या योजनांविषयी माहिती दिली. राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावर आयसीएआय पुणे शाखा आणि ‘विकासा’ विद्यार्थी शाखेला द्वितीय क्रमांकाचे प्रत्येकी दोन पारितोषिक मिळाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच सर्व सहकारी व कर्मचारी यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सीए प्रणव आपटे म्हणाले, “मला अध्यक्षपदी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सर्व सीए सदस्यांचे आभार मानतो. एआय तंत्रज्ञान प्रशिक्षण, शाश्वत व पर्यावरणपूरक गोष्टींचा वापर, सीए सदस्य व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त असे नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबवणार आहे. आज पुणे शाखेचे १२,००० पेक्षा अधिक सभासद आहेत, तर २५००० पेक्षा जास्त विद्यार्थी पुणे शाखेशी संलग्नित आहेत. त्यामुळे त्यांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.”

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now