पुणे | प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे माजी खासदार Suresh Kalmadi यांचे आज मंगळवार (६ जानेवारी) रोजी पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते आजारपणामुळे त्रस्त होते.
सुरेश कलमाडी यांचे पार्थिव दुपारी दोन वाजेपर्यंत पुण्यातील कलमाडी निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पुण्याच्या राजकारणावर दीर्घकाळ प्रभाव
केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना सुरेश कलमाडी यांनी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळली. पुण्याच्या राजकारणात त्यांचा मोठा दबदबा होता. एक मोठा जनाधार आणि संघटनात्मक पकड यांच्या जोरावर ते अनेक वेळा पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले. दीर्घ काळ पुण्याच्या राजकीय समीकरणांवर कलमाडी यांची छाप स्पष्टपणे दिसून येत होती.
राष्ट्रकुल घोटाळा आणि उतरणीचा काळ
२०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांतील कथित घोटाळ्यामुळे सुरेश कलमाडी यांची राजकीय कारकीर्द डागाळली. आयोजन समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झाले आणि त्यांना अटकही झाली. या प्रकरणामुळे त्यांच्या राजकीय आयुष्यात उतरणीचा काळ सुरू झाला.
मात्र, अनेक वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर एप्रिल २०२५ मध्ये अंमलबजावणी संचालनालयाने (ED) सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टनंतर त्यांना क्लीन चिट मिळाली होती. तरीही, त्यानंतर ते पुण्याच्या सक्रिय राजकारणात पुन्हा प्रभावीपणे कमबॅक करू शकले नाहीत.
आजारपणामुळे राजकारणापासून दूर
गेल्या काही वर्षांपासून सुरेश कलमाडी राजकारणापासून दूर होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते Sharad Pawar यांनी त्यांची भेट घेतली होती.
माजी खासदार सुरेश कलमाडी कोण होते?
सुरेश शामराव कलमाडी (जन्म : १ मे १९४४) हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार आणि नामवंत क्रीडा प्रशासक होते. त्यांनी पुणे लोकसभा मतदारसंघाचे अनेक वेळा प्रतिनिधित्व केले. ते भारतीय ऑलिंपिक असोसिएशनचे अध्यक्ष तसेच २०१० च्या दिल्ली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांच्या आयोजन समितीचे अध्यक्ष होते. राजकारणात येण्यापूर्वी ते भारतीय वायुसेनेत वैमानिक म्हणूनही कार्यरत होते.
पुण्याच्या राजकारणात दीर्घकाळ प्रभाव टाकणाऱ्या, वादग्रस्त पण तितक्याच चर्चित अशा या नेत्याच्या निधनाने पुणे आणि राज्याच्या राजकारणात एक महत्त्वाचे पर्व संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.









