रुग्ण हक्क परिषदेतर्फे संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन

पुणे: रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पुणे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे सकाळी कार्यक्रमाला सुरुवात झाली. संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करत कार्यक्रमाची सुरुवात झाली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाच्या ५० प्रति उपस्थितांना प्रदान करण्यात आल्या. रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण आणि माजी सहा. पोलीस आयुक्त मिलिंद गायकवाड यांनी संविधानातील मूलभूत हक्क व रुग्णांच्या अधिकारांचा परस्परसंबंध प्रभावीपणे स्पष्ट केला.

उमेश चव्हाण म्हणाले, “रुग्णाला उपचार घेण्याचा अधिकार हा संविधानातील कलम २१ अंतर्गत जीवनाच्या अधिकाराचाच भाग आहे.” परिषदेच्या सदस्यांनी रुग्ण हक्क चळवळीला संविधानाची ताकद कशी मिळते यावर मार्गदर्शनपर व्याख्यान सादर केले. शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, गौरव चव्हाण, नितीन चाफळकर, आशिष गांधी, अमृता जाधव, रेखा वाघमारे, प्रभा अवलेलू, चित्रा साळवे यांच्यासह रुग्ण हक्क परिषदेचे शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. संविधानाच्या रक्षणाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. परिषदेने येत्या वर्षभरात संविधान जागृतीसह रुग्ण हक्क जनजागरण मोहीम राबवण्याचे जाहीर केले.