मुंबई – वाढत्या अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर महिलांमध्ये आत्मबळ आणि शौर्याची भावना जागृत करण्याच्या उद्देशाने, हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेने राज्यभरात विविध ठिकाणी ‘शस्त्रपूजन’ आणि ‘स्वसंरक्षण प्रशिक्षण’ प्रात्यक्षिकांचे आयोजन केले. या उपक्रमांमधून महिलांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर सक्षम बनवणे, त्यांच्यात संघटनात्मक शक्ती वाढवणे आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. जळगाव येथे भाजपचे आमदार सुरेशमामा भोळे यांनी युवतींनी लवकरात लवकर महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कायदा करावा या विषयाची निवेदन दिले. अशाच प्रकारे राज्यातील विविध लोकप्रतिनिधींना निवेदने दिली जात आहेत.
विजयादशमीच्या मुहूर्तावर, शक्तीच्या उपासनेची परंपरा जपत रणरागिणी शाखेने राज्यभरात कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या कार्यक्रमांमध्ये तलवार, दांडपट्टा, भाले, कट्यार यांसारख्या पारंपरिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले. ‘मैं हूँ दुर्गा’ या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमांनी महिलांना त्यांच्यातील सुप्त शक्तीची जाणीव करून दिली. या प्रसंगी रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके सादर केली. यामध्ये कराटे, लाठीकाठी आणि जुडो यांसारख्या प्रशिक्षण प्रकारांचा समावेश होता. अचानक होणारे हल्ले कसे परतवून लावावेत आणि स्वतःचे रक्षण कसे करावे, याचे धडे महिलांना देण्यात आले. या प्रशिक्षणांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन त्या स्वयंसिद्ध आणि निर्भय बनतील, हा यामागील उद्देश आहे.
रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी सांगितले की , ‘‘आजची स्त्री अबला नसून ती दुर्गेचेच रूप आहे. समाजात महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचार रोखण्यासाठी केवळ कायद्यावर अवलंबून न राहता, प्रत्येक स्त्रीने स्वतःच्या रक्षणासाठी सक्षम होणे ही काळाची गरज आहे. रणरागिणी शाखा स्वसंरक्षण प्रशिक्षणाच्या माध्यमातून हेच शौर्य आणि धाडस महिलांमध्ये जागवत आहे. आमचा उद्देश महिलांना केवळ शारीरिकदृष्ट्याच नव्हे, तर मानसिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही सशक्त करून एक निर्भय समाज घडवणे हा आहे.’’
या उपक्रमांना राज्यभरातून महिला आणि युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक महिलांनी स्वसंरक्षण प्रशिक्षण शिकण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमांमुळे महिलांचे संघटन होऊन त्यांच्यातील आत्मविश्वास वाढण्यास मोठी मदत झाली आहे, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
