पुणे, ऑक्टोबर: नवव्या एसएनबीपी अखिल भारतीय (१६ वर्षांखालील मुले) हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत मंगळवारी ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी संघ राउंड ग्लास अकादमीशी दोन हात करेल.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिव छत्रपती क्रीडा संकुलात मंगळवारी सहाव्या दिवशी सोमवारी उपांत्य फेरीत गतविजेत्या राउंड ग्लास अकादमीने गुमनहेरा अकादमीचा ८-२ असा पराभव केला, त्यानंतर ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमीने गेल्या वर्षीच्या उपविजेत्या आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीवर ६-४ अशी मात करून पहिल्यांदाच अंतिम फेरीत धडक मारली. पुणे शहरात चार स्पर्धा खेळल्यानंतर ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमीने प्रथमच फायनल प्रवेश केला आहे. चार गोल करणारा करण टिग्गा त्यांच्या विजयाचा शिल्पकार ठरला.
उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात, ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमीने आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनीविरुद्ध आक्रमक खेळ केला. करण टिग्गाने (५व्या मिनिटाला) पहिला पेनल्टी कॉर्नर गोल केला. त्यानंतर आशिक सुरीनने (९ व्या मिनिटाला) मैदानी तसेच करण टिग्गाने (२२ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरमधून वैयक्तिक दुसरा गोल करताना संघाला मध्यंतराला ३-० अशी मोठी आघाडी मिळवून दिली.
उत्तरार्धात पहिल्या टप्प्यात आर्मी बॉईजने वर्चस्व गाजवले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये त्यांनी तीन गोल केले. कर्णधार अर्जुनने (३९ व्या मिनिटाला) पेनल्टी कॉर्नरवर पहिला गोल केला. त्यानंतर साहिल कुमार (४० व्या मिनिटाला) आणि अर्जुनच्या (५१ व्या मिनिटाला) गोलच्या जोरावर त्यांनी ३-३ अशी बरोबरी साधली.
चौथ्या क्वार्टरमध्ये, नेव्हल टाटा संघाने पुन्हा एकदा गियर्स बदलले. करण टिग्गा (४७ मिनिट), आशिक सुरीन (५१ मिनिट) आणि करण टिग्गा (५३ मिनिट) यांच्या मदतीने आणखी तीन गोल (६-३) करत पुन्हा आघाडी घेतली. आर्मी बॉईजकडून शेवटचा गोल अर्जुन (५७ मिनिट) यांच्या गोलद्वारे दिला. मात, ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमीने ४-६ अशा फरकाने बाजी मारली.
दुसऱ्या उपांत्य फेरीत, राउंड ग्लास अकादमीने दमदार कामगिरीसह गुमनहेरा हॉकी अकादमीवर ८-२ असा विजय मिळवला. राउंड ग्लासच्या विजयात वरिंदर सिंग (९, ३४, ४८ मिनिट), अर्शदीप सिंग (१३ मिनिट), रोमित पाल (१४, ३६ मिनिट) आणि अर्शप्रीत सिंगने (२३, २७ मिनिट) मोलाचा वाटा उचलला. गुमनहेरा अकादमीकडून सिद्धार्थ राजू (१२ मिनिट) आणि सुशांत शेरावतने (५२ मिनिट) गोल केले.
निकाल (सहावा दिवस; उपांत्य फेरी):
पहिली उपांत्य फेरी: ओडिशा नेव्हल टाटा ग्रासरूट्स अकादमी 6( करण तिग्गा 5’, 22’, 47’, 53’; आशिक सुरीन ९’, ५१’) विजयी वि. आर्मी बॉईज स्पोर्ट्स कंपनी: ४ (अर्जुन ३९’, ५१’, ५७’; साहिल कुमार ४०’) मध्यंतर: ३-०
पहिली उपांत्य फेरी: राउंड ग्लास अकादमी: 8 (वरिंदर सिंग 9’, 34’, 48’; अर्शदीप सिंग 13’; रोमित पाल 14’, 36’; अर्शप्रीत सिंग 23’, 27’) विजयी वि. गुमनहेरा अकादमी: 2 (सिद्धार्थ राजू 12’; सुशांत 5’). मध्यंतर: 5-1.