आशयघन, प्रादेशिक सिनेमातील वेगळेपण वास्तववादी: डॉ. मोहन आगाशे

पुणे: “सिनेमा हे एक वास्तव मांडण्याचे प्रभावी माध्यम आहे. अनेक प्रादेशिक सिनेमांतून अजरामर कलाकृती जन्माला येतात. मनाला भिडणाऱ्या आशयघन व प्रादेशिक सिनेमांतील वास्तववादीपणा हे त्याचे वेगळेपण आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केले. सिनेमा पाहण्याची एक कला असून, तो कसा पाहावा, याचे भान देणारे ‘लाईमलाईट प्रादेशिक’ हे पुस्तक असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. 

प्रादेशिक सिनेमांची अनोखी सफर घडवणाऱ्या ‘लाईमलाईट प्रादेशिक’ या अच्युत गोडबोले व सतीश कुलकर्णी लिखित, तसेच रूद्र पब्लिशिंग हाऊस प्रकाशित पुस्तकाचे प्रकाशन डॉ. आगाशे यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील लजपतराय भवन विद्यार्थी संकुलात झालेल्या कार्यक्रमावेळी विद्यार्थी सहायक समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजनकर, प्रकाशक नवनाथ जगताप, चंद्रकांत अडसूळ, सुनील माने, सुरेश गाडीलकर, प्रशांत बांदल, अप्पासाहेब जगताप यांच्यासह सिनेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

डॉ. मोहन आगाशे म्हणाले, “सिनेमातील वेगळेपण लोकांपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न लेखकांनी केला आहे. मनोरंजन क्षेत्राचेही व्यावसायिकरण झाल्याने समाजाला प्रभावी दिशा देणाऱ्या सिनेमांची निर्मिती कमी होते. सिनेमा अवाढव्य स्वरूपात दाखवण्याची चढाओढ निर्माण झाली आहे. मानवाची बौद्धिक विचार क्षमता कमी असल्याने सिनेमा पाहताना त्यातील संदेश प्रेक्षकांपर्यंत पोहचेलच, याची खात्री नसते. अशावेळी सिनेमाला पाहण्याची वेगळी नजर ‘लाईमलाईट’मधून मिळेल.”

सत्यजित रे, शाम बेनेगल, मिस्टर अँड मिसेस अय्यर, चार्ली चापलीन यावर विस्तृत लिखाण केले आहे. बोली भाषेतून सिनेमाच्या भाषेकडे केलेला प्रवास लाईमलाईटमध्ये दिसतो. त्यामुळे सिनेमांवर आधारित पुस्तक आणि त्यात प्रादेशिक भाषा, त्यातील अविस्मरणीय कलाकृतीवर केलेल्या भाष्यामुळे हे पुस्तक वाचनीय ठरेल. नवीन प्रेक्षक, श्रोते निर्माण निर्माण होतील, असा विश्वास आगाशे यांनी व्यक्त केला.

अच्युत गोडबोले म्हणाले, “सिनेमा क्षेत्रात अनेक कलाकारांनी महान काम करून ठेवले आहे. आतापर्यंत विज्ञान-तंत्रज्ञान, गणित, अर्थशास्त्र यावर अनेक पुस्तके लिहिली. मात्र, सतीश कुलकर्णी यांच्या सिनेक्षेत्रातील अजरामर कलाकृती, प्रादेशिक सिनेमावरील लेखमाला पाहून मला सिनेमावर पुस्तक लिहण्याचा मोह झाला. हे पुस्तक वाचल्यानंतर सिनेमा प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभूती वाचकांना मिळेल.”

सतीश कुलकर्णी म्हणाले, “ज्यांचे सिनेमे पाहून मोठा झालो, त्यांच्याच हस्ते प्रकाशन होत असल्याने भारावून गेलो आहे. सिनेमा प्रदर्शित होतानाची तत्कालीन परिस्थिती, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टी आणि त्यातून दिला जाणारा संदेश, समाज भान, वास्तव यातून जाणीव निर्माण झाल्याने या पुस्तकाची निर्मिती झाली. बंगाली, कानडी, गुजराती, मैथिली भाषेतील सिनेमांविषयीचे लेखन वाचकांना आवडेल.”

वाचकांना दर्जेदार पुस्तके देण्यासाठी रुद्र पब्लिशिंग हाऊस आणि पुस्तकविश्व नेहमीच प्रयत्नशील असते. प्रादेशिक सिनेमांची सफर घडवणारे हे पुस्तक वाचकांना नवी दिशा देईल, असा विश्वास वाटतो, असे नवनाथ जगताप यांनी प्रास्ताविकात सांगितले. चित्कला कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. तुषार रंजनकर यांनी आभार मानले.