नोंदणी महानिरीक्षक सोनावणे यांना निलंबित करा

पुणे : बेकायदेशीर केलेल्या प्रतिनियुक्त्या रद्द करून लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याअंतर्गत नोंदणी महानिरीक्षक हिरालाल सोनावणे, नोंदणी उपमहानिरीक्षक उदय चव्हाण, सहायक नोंदणी महानिरीक्षक किशोरकुमार मगर, श्रीमती कुलकर्णी, सोमनाथ जाधव यांचेवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हे दाखल करून चौकशी करावी. तसेच हिरालाल सोनवणे यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी केली.

महसूल विभागातील या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी सुरवसे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, महसूल सचिव व उपसचिव, तसेच अन्य संबंधित विभागांना निवेदन दिले आहे.

रोहन सुरवसे पाटील म्हणाले, “नोंदणी महानिरीक्षक कार्यालयातील भ्रष्टाचाराबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी केलेल्या आहेत. दुय्यम निबंधक प्रशांत कुमठकर यांची मुळ नेमणुक विदर्भामध्ये होती. त्यांनी आपली नियुक्ती मुंबईत केली. त्यानंतर मोठी रक्कम घेऊन कुर्ला-४ येथे त्यांची नेमणुक केली. ही नियुक्ती बेकायदेशीर व नियमबाह्य होती. अखेर शासनाने ती रद्द केली. परंतु, रायगड जिल्ह्यातील दुसरी प्रतिनियुक्ती खालापूर येथे केली असून, अजुनही ती रद्द केलेली नाही. नागपुर येथील दुय्यम निबंधक यांना नोंदणी महानिरीक्षक कार्यालयामध्ये आणले व तेथून त्यांना नियमबाह्य व बेकायदेशीरपणे त्यांना खालापूर येथे नेमले या दोनच पोस्टींगमध्ये या तिघांनी काही कोटी रुपये कमाविले असल्याचा संशय आहे.”

“या प्रकरणामध्ये नोंदणी महानिरीक्षक डीआयजी व सहाय्यक नोंदणी महानिरीक्षक यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्यामुळे त्यांचे तात्काळ निलंबन करून एसीबीमार्फत चौकशी करावी. त्यांना संरक्षण कोण देत आहे, याचा शोध घ्यावा. दुय्यम निबंधक यांच्या बदलीचा दर काही लाखाच्याही पुढे गेला आहे. असे सर्व सामान्य जनतेमधून बोलले जाते. हे पैसे वरती कोणाकोणाला दिले जातात, याचीही चौकशी झाली पाहिजे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची शासन स्थरावर व आर्थिक गुन्हे शाखा व अँन्टीकरप्शन द्वारे चौकशी करावी,” असे सुरवसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.