पुणे, जून २०२४ : अमरावतीचा 13-0 असा धुव्वा उडवत पुणे (पीडीएफए) संघाने बोईसर (पालघर) येथे सुरू असलेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आंतरजिल्हा ज्युनियर (मुली) फुटबॉल स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.
रविवारी झालेल्या सलामीच्या लढतीत पुणे संघाने तुलनेत कमकुवत प्रतिस्पर्ध्यांवर सर्व आघाड्यांवर वर्चस्व राखले. सहा खेळाडूंनी मिळून तब्बल 13 गोल केले. त्यात याशिका तेजवानी (पहिल्या, 10व्या, 15व्या मिनिटाला), शीन शर्मा (पाचव्या, 20व्या, 23व्या मिनिटाला) आणि इपशिता गवारीच्या (21व्या, 29व्या, 45व्या मिनिटाला) प्रत्येकी तीन गोलांचा मोठा राहिला.
उपकर्णधार तेजस्विनी थाप्पाने दोन (17व्या, 21व्या मिनिटाला) तसेच दिया शेरी (13व्या मिनिटाला) आणि केया तेलंगने (17व्या) प्रत्येकी एक दोन करताना सांघिक खेळ उंचावण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
पुणे संघाच्या आक्रमण फळीने गोलांची बरसात केली. त्यांना बचावफळीचीही चांगली साथ लाभली. त्यामुळे प्रतिस्पर्धी अमरावती संघाची गोलपाटी कोरी राहिली.