जालना, प्रतिनिधी-मानस : मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण मिळावं या मागणीवर मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. आपल्या या मागणीसाठी त्यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. याचदरम्यान त्यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. गेले 3 दिवस जरांगे पाटलांची डॉक्टरांच्या पथकाकडून तपासणी करण्यात येत आहे. मात्र त्यांनी उपचार घेतलेले नाहीत. त्यामुळे जरांगे यांची प्रकृती आज चौथ्या दिवशी काहीशी खालावली आहे.
राज्य सरकारने मराठा समाजाच्या सगे सोयरे कायद्यासह इतर मागण्यांबाबत तातडीनं कारवाई करावी, अन्यथा लोकसभेला यांची थोडी फजिती झाली. विधानसभा निवडणुकीत यांचे सगळे उमेदवार पाडून टाकू असा इशाराही जरांगे पाटलांनी दिला आहे. दरम्यान आज जरांगे यांच्या उपोषणाचा चौथा दिवस असून, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी राज्य सरकारचं शिष्टमंडळ येतं की नाही हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
जरांगे पाटील यांनी चार जूनपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र अचारसंहितेमुळे त्यांनी आपलं आंदोलन पुढे ढकललं. अखेर आठ जूनपासून ते अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. जरांगे पाटील यांच्या उपोषणाला अंतरवाली सराटीमधीलच काही नागरिकांचा विरोध झाल्यानं हे आंदोलन चांगलच चर्चेत आलं.