सुखद वाटचालीतून एक अलौकिक आत्मशोध म्हणजे – “शोध स्वतःचा” पुस्तक

“शोध स्वत:चा”हे पुस्तक या पुस्तकात नेमके काय आहे. कुठली दंत कथा,  का भयंकर कथा.  षड्यंत्राने आणि हत्येनं भरलेली उत्तेजनात्मक कथा यात आहे ?  मग नेमका कोणता विषय यात मांडलेला आहे? कुठला महत्त्वपूर्ण आशय वाचकांसमोर सादर केला आहे? हा बारावा कोण आहे? याविषयीचं कमालीचं औत्सुक्य वाढवणारी अकल्पित अशी ही कथा यात आहे.  न्याय, स्वास्थ्य, आनंद आणि नातेसंबंधात एक अनोखी समज देणारा हा आश्चर्यकारक शोध… अंतर्यामी सतत उपलब्ध असणारा एक अभूतपूर्व अनुभव तसेच चैतन्याकडे नेणारा एक सुरेल प्रवास बरोबर एक आध्यात्मिक सुखद वाटचालीतून एक अलौकिक आत्मशोध या “शोध स्वतःचा” या कथानकात गुंफलेला आहे.

कित्येक लोक आपल्या अपयशाचं खापर इतरांना दोष देऊन त्यांच्या माथ्यावरच फोडतात. वैवाहिक जीवन सुखी नसल्याबद्दल जोडीदाराला दोष… काम करण्याच्या ठिकाणी असलेल्या दुःखाबद्दल वरिष्ठांना दोष… राग आल्याबद्दल नातेवाईकांना दोष… संगोपन नीट झालं नाही म्हणून पालकांना दोष… सतत दोष देणे हा दुःखपूर्ण आयुष्य जगण्याचा संकेत नव्हे का… वास्तविक यात आपल्या स्वतःचाच बळी जात असतो. प्रत्येक घटनेबाबत मी स्वतःच कसा जबाबदार आहे हे वास्तव जोवर आपण स्वीकारत नाही, तोवर आपला विकास होणार नाही. सरश्री लिखित शोध स्वतःचा हे पुस्तक प्रत्येक वाचकाला जगण्याची प्रेरणा देईल. 

जेव्हा तुम्ही बदलता तेव्हा इतर लोकही बदलू लागतात. कारण तुम्ही बदलून त्यांना बदलण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केलेलं असतं. हे पुस्तक म्हणजे आपल्या सर्वोत्कृष्ट जीवनाकडे व अंतिम सत्याकडे नेणाऱ्या यशोशिखराची पायरी ठरावे… या पुस्तकात असलेलं ज्ञान जीवनात उतरवताना ही समज मिळेल, एका नवीन जगाच्या निर्मितीत तुमचा सहभाग नक्कीच असणार आहे. सरश्रींचा आध्यात्मिक शोध त्यांच्या बालपणापासूनच सुरू झाला होता. हा शोध सुरू असताना त्यांनी अनेक प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास केला. त्याचबरोबर आपल्या आध्यात्मिक शोधात मग्न राहून त्यांनी अनेक ध्यानपद्धतींचा अभ्यास केला. त्यांच्या या शोधाने त्यांना अनेक वैचारिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जाण्यासाठी प्रेरित केले. सदरील पुस्तक हे सर्व ऑनलाईन संकेत स्थळांवर उपलब्ध असून त्या ठिकाणाहून वाचकांना खरेदी करता येणार आहे.