आंतरजिल्हा फुटबॉल ज्युनियर स्पर्धेत पुणे संघाला तिसरे स्थान – प्ले-ऑफ सामन्यात रायगडचा 5-0 असा धुव्वा, याशिकाचे 3 गोल

पुणे, जून 2024: प्ले-ऑफ सामन्यात रायगडचा 5-0 असा धुव्वा उडवत पुणे संघाने बोईसर (पालघर) येथे झालेल्या वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन (विफा) आंतरजिल्हा फुटबॉल ज्युनियर (मुली) स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले. याशिका तेजवानीचे तीन गोल त्यांच्या मोठ्या विजयाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
गुरुवारी झालेल्या प्ले-ऑफ फेरीत, पुण्याने सर्वोत्तम सांघिक कामगिरीच्या जोरावर प्रतिस्पर्धी रायगडवर पाच गोल केले. याशिका तेजवानीने (चौथ्या, 20व्या, 30व्या मिनिटाला) गोल हॅट्ट्रिक साधताना विजयात सिंहाचा वाटा उचलला. अँजेला गुट्टल (21व्या मिनिटाला) आणि तनिषा अजमेराने (26व्या मिनिटाला) प्रत्येकी एक गोल करताना विजयाला हातभार लावला.
तत्पूर्वी, कोल्हापूरचा 1-0 असा पराभव करत ठाणे संघाने विजेतेपद पटकावले. स्पर्धेचा अंतिम निकाल पाहता ठाणे जिल्हा संघाने पहिले, कोल्हापूरने दुसरे आणि पुणे संघाने तिसरे स्थान राखले.