२४ ते ३० जून या कालावधीत गोव्यात ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ !

संविधान-विरोधी, देशविरोधी शक्तींना रोखण्यासाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

        पणजी – आपल्या देशातील लोकशाही व्यवस्थेनुसार निवडून येणारे जनतिनिधी हे संसदेत बसून देशातील जनतेच्या हितांचे रक्षण करणारे, तसेच जनतेला सुरक्षा देणारे कायदे बनवतात; मात्र ज्यांना भारताचे संविधान, सार्वभौमता आणि कायदेच मान्य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्चितच भविष्यात या संविधानाला धोका निर्माण होऊ शकतो. या लोकसभा निवडणुकीत पाकिस्तानच्या आय.एस्.आय.शी संबंध असल्याचा आरोप असणारा खलिस्तानवादी नेता अमृतपाल सिंह आणि काश्मीरमध्ये आतंकवाद्यांना अर्थपुरवठा करण्याच्या आरोपावरून अटक असणारा ‘रशीद इंजिनियर’ यांच्यासारखे लोक देशविरोधी, तसेच फुटिरतावादी तुरुंगातून निवडून आले आहेत. तर दुसरीकडे ‘गोव्यातील जनतेवर संविधान जबरदस्ती लादले गेले’, असे म्हणून गोमंतकाला मुक्त करण्यासाठी लढणार्‍या क्रांतीकारकांचा अपमान करणारे विरियातो फर्नांडिस हे खासदार म्हणून निवडून येणे हे एकप्रकारे भारतीय लोकशाहीचे अपयश म्हणावे लागेल.

        देशाच्या सुरक्षिततेचा विचार केला तर, माता वैष्णोदेवीला जाणार्‍या भक्तांच्या बसवरील आतंकवादी हल्ल्यावरून समोर आले आहे की, काश्मीरमधील आतंकवाद आता हळूहळू हिंदुबहुल जम्मूच्या दिशेने सरकत आहे. पंजाबमधील खलिस्तानवादी चळवळीसह राष्ट्रविरोधी आणि विदेशी शक्ती भारताला अस्थिर करण्यासाठी जोमाने सक्रीय झाल्या आहेत. भारतासह जगभरातील हिंदूंवरील हल्ले वाढले आहेत, जयपूरमधून मुसलमानबहुल क्षेत्रांतून हजारो हिंदूंचे पलायन होत आहे. पश्चिम बंगालमध्येही हिंदूंवर आणि मंदिरांवर हल्ले वाढले आहेत. जागतिक स्तरावर विविध देशांमधील  युद्धे आणि अस्थिरता पाहता अनेक देश भारताकडे आशेने पाहत आहेत; कारण हिंदु धर्म हा एकमात्र धर्म आहे की, जो विश्वबंधुत्वाची आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ची संकल्पना मांडून सर्व समाजाला जोडू शकतो अन् एकसंघ ठेवू शकतो. यासाठीच हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्याला गती देण्यासाठी प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही १२ वे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ अर्थात् ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव २४ ते ३० जून २०२४ या कालावधीत ‘श्री रामनाथ देवस्थान’, फोंडा, गोवा येथे संपन्न होणार आहे, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पणजी येथील ‘हॉटेल मनोशांती’ येथे आयोजित पत्रकार परिषदेस हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस आणि ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे गोवा राज्य सचिव श्री. जयेश थळी हे उपस्थित होते.

‘सनातन संस्थे’चे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस म्हणाले की, ‘सनातन धर्मावर होत असलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी, तसेच सनातन धर्माचा गौरव वाढवण्यासाठी’ सनातन धर्मरक्षण अभियान राबवण्यात आले. या अधिवेशनातून ‘सनातन धर्माची वैचारिक सुरक्षे’वर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे. या वेळी ‘गोमंतक मंदिर महासंघा’चे गोवा राज्य सचिव श्री. जयेश थळी म्हणाले की, हिंदू अधिवेशनामध्ये ठरलेल्या ‘मंदिर संस्कृती रक्षणा’चे धोरणानुसार ‘मंदिर महासंघा’च्या वतीने महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक राज्यात ७१० हून अधिक मंदिरांनी वस्त्रसंहिता लागू केली आहे. हे अभियान आणखीन व्यापक करण्यात येईल. तसेच मंदिर संस्कृती रक्षणासाठी दिशा ठरवण्यात येईल.

भारताला पुन्हा ‘विश्वगुरु’ बनवण्याचे ध्येय ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ

          या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ म्हणाले की, ‘हिंदु राष्ट्र’ हा मुद्दा केवळ भारताच्या स्तरावर नव्हे, तर विश्वपटलावर चर्चिला जात आहे. गेल्या दहा-बारा वर्षांतील देशातील वातावरण पहाता विविध देश भारताची हिंदु राष्ट्राकडे वाटचाल चालू असल्याचे सूतोवाच करत आहेत. अमेरिकी प्रसिद्धीमाध्यमांनी रामजन्मभूमीत श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठापणेला ‘न्यू डिवाइन इंडिया’ म्हटले । ‘नमस्ते म्हणणे’, ‘योग करणे’, ‘संवाद’ आदी भारतीय वैशिष्ट्यांचे अनुसरण विदेशी करत आहे. आता ‘भारतला विश्वगुरु बनवणे’ हे आमचे ‘वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवा’चे या वर्षीचे ध्येय आहे. त्यामुळे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ खर्‍या अर्थाने ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ झाला आहे. या अधिवेशनाला अमेरिका येथून नीलेश नीलकंठ ओक, त्रिनिदाद आणि टोबॅगो येथून स्वामी ब्रह्मस्वरुपानंद महाराज, घाना येथून श्रीनिवास दास, नेपाळमधून श्री. शंकर खराल, श्री. त्रिलोक ज्योती श्रेस्ता, श्री. जगन्नाथ कोईराला, श्री. लक्ष्मण पंथी, श्री. संतोष शहा, इंडोनेशिया येथून श्री. धर्म यशा येणार आहेत. यांसह भारतातील २६ राज्यांतील १००० हून अधिक हिंदु संघटनांच्या २००० हून अधिक प्रतिनिधींना निमंत्रित करण्यात आले आहे. यात प्रामुख्याने निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर नर्मदाशंकरपुरी महराज, भारत सेवाश्रम संघाचे पूर्वोत्तर क्षेत्राचे मुख्य संयोजक स्वामी साधनानंद महाराज, इंदूर येथील महामंडलेश्वर स्वामी प्रणवानंद सरस्वती महाराज, ‘इंटरनॅशनल वेदांत सोसायटी’चे स्वामी निर्गुणानंदगिरी महाराज, छत्तीसगड येथील श्रीरामबालकदास महात्यागी महाराज आदी संतांची वंदनीय उपस्थितीही लाभणार आहे.

        यंदाच्या अधिवेशनामध्ये २४ ते २६ जून या कालावधीत ‘हिंदु राष्ट्र अधिवेशन’ संपन्न होत आहे. यामध्ये देशभरातील प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून कार्य करणार्‍या हिंदु संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहे. वर्षभरात हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी ‘समान कृती कार्यक्रम’ निश्चित केले जाणार आहेत. २७ जूनला ‘हिंदु राष्ट्र विचारमंथन महोत्सव’ संपन्न होणार आहे. यामध्ये देशभरातील हिंदुत्वनिष्ठ विचारवंत, लेखक, व्याख्याते, जे वैचारिक स्तरावर हिंदु राष्ट्राविषयी जागृती करत आहेत, त्यांचा सहभाग असणार आहे. २८ जूनला ‘मंदिर संस्कृति परिषद’ आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशभरातील मंदिरांचे विश्वस्त, पुजारी एकत्रित येणार आहेत. मंदिर-संस्कृतीचे जतन, संवर्धन आणि रक्षण याविषयांवर तज्ञ मंडळींची भाषणे आणि परिसंवाद यांचे आयोजन असेल. तर २९ ते ३० जून या कालावधीत ‘अधिवक्ता संमेलन’  आयोजित  करण्यात  येणार आहे.  यामध्ये  हिंदु संघटना, कार्यकर्ते  यांच्यावर होणार्‍या अत्याचारांच्या संदर्भात न्यायालयीन साहाय्य करणारे, विविध आघातांच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ते या संमेलनात सहभागी होणार आहेत.

         याशिवाय प्रामुख्याने श्रीरामजन्मभूमी मुक्तीसाठी, तसेच काशी येथील ज्ञानवापी मशिदीच्या विरोधात न्यायालयीन लढा देणारे अधिवक्ता विष्णु शंकर जैन, संरक्षण विशेषज्ञ कर्नल आर्.एस्.एन्. सिंह, सर्वाेच्च न्यायालयातील अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारका’चे कार्याध्यक्ष श्री. रणजीत सावरकर, तेलंगणा येथील हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह, ‘भारत माता की जय’ संघटनेचे श्री. सुभाष वेलिंगकर, भारताचे माजी माहिती आयुक्त तथा ‘सेव कल्चर सेव भारत’चे संस्थापक श्री. उदय माहूरकर यांच्यासह वरिष्ठ अधिवक्ता, उद्योजक, विचारवंत, लेखक, मंदिर विश्वस्त, तसेच अनेक समविचारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत.

       या अधिवेशनाचे थेट प्रक्षेपण हिंदु जनजागृती समितीचे संकेतस्थळ HinduJagruti.org याद्वारे, तसेच समितीच्या ‘HinduJagruti’ या ‘यु-ट्यूब’ चॅनेल आणि facebook.com/hjshindi1 या ‘फेसबुक’द्वारेही केले जाणार आहे. जगभरातील हिंदुत्वनिष्ठांनी या ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा लाभ घ्यावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात आले.