पुणे : सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये दहशतवाद विरोधी दिन व बुद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या दोन्ही दिवसांच्या निमित्ताने अहिंसा, क्षमा, करुणा याचा संदेश देणारी ‘अहिंसा नाऊ अँड देन: अ मेसेज ऑफ नॉन व्हॉईलन्स’ हे स्किट सादर करण्यात आले. या कार्यक्रमात कला, विज्ञान आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या कार्यक्रमात विद्यार्थी व शिक्षकांनी गौतम बुद्धांना अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सामाजिक जबाबदारीचा भाग म्हणून प्रत्येकाने आपल्या परीने जगात शांतता व एकोपा पसरवण्यासाठी प्रोत्साहन देण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
या नाटिकेत दोन कथानक होते. पहिल्या भागात दहशतवाद, विमानाचे अपहरण, मुलांचे अपहरण, दंगल, बॉम्बस्फोट आणि सायबर गुन्हे यासारख्या विविध प्रकारांबद्दल वर्णन केले होते. शरण्या चक्रवर्ती आणि अर्णव काळे यांनी या नाटिकेची संकल्पना व उद्देश सांगितला. दहशतवाद हीच मानवतेची सर्वात मोठी समस्या असल्याचे यातून दाखवण्यात आले. गौतम बुद्धांची शिकवण विश्वात शांतता व आनंदमय जीवन प्रस्थापित करण्यासाठी उपयुक्त आहे.
दुसऱ्या भागात प्राचार्या वंदना पांडे यांनी समजावून सांगितला. त्यांनी इंग्रजी साहित्यातील महान कवी टी. एस. एलियट यांच्या ‘द वेस्ट लँड’ या रचनेचा उल्लेख केला. लोकांचा लोभ, वासना आणि न संपणाऱ्या इच्छांमुळे सुंदर पृथ्वीचे रूपांतर ओसाड भूमीत झाले आहे. भारत हा पूर्वेकडील देश या जगाला समाधान देणार असल्याचे महाकाव्यावर नमूद केलेल्या उपायाकडे त्यांनी लक्ष वेधले. शरण्या चक्रवर्ती हिने हुबेहूब साकारलेला गौतम बुद्धांचा वेष सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता.
बारावी इयत्तेच्या विज्ञान शाखेच्या मुकुंद धर्मावत या विद्यार्थ्याने स्किटचे लेखन केले होते. त्याने भगवान बुद्धांच्या जन्माची कथा ते संत म्हणून त्यांचे परिवर्तन, जागतिक मानवी समुदायाची सेवा करण्यासाठी प्राप्त केलेले ज्ञान सांगितले. नाटिकेच्या शेवटी सूर्यदत्त पब्लिक स्कूलच्या प्राचार्या श्रीमती किरण राव यांनी अहिंसा, शांतता आणि सौहार्द यावर भर देणारी शपथ दिली.
भूमी त्रिवेदी, दिप्ती माळी, अनुष्का आव्हाड, अमृता मलिक, भूमिका त्रिवेदी, शुभांगी भांबळे, तनुश्री पट्टावार, सुनीता पवार, दीपदेवी प्रजापत, आकांक्षा पांडे, आर्यन बाबू, दीपिका उप्परी आणि वैष्णवी धुतमाळ या कलाकारांनी विविध भूमिका साकारून ही नाटिका उत्तमरीत्या सादर करत उपस्थितांची वाहवा मिळवली.
स्टाफमधील पिंकी कर्माकर आणि अंकिता जाधव यांनी ध्वनी संयोजन केले. ‘अहिंसा : नाऊ अँड देन’ शीर्षक दर्शविणाऱ्या फ्लेक्सने कलाकारांसाठी संपूर्ण मंच सजवला. इयत्ता बारावीचा विद्यार्थी अद्वैत नामजोशी याच्यासह सर्व श्रोत्यांनी आणि सहभागींनी ‘सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे संतु निरामय’, ‘जगा आणि जगू द्या’ हेच अंतिम उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “मुलांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेमाची भावना रुजावी, यासाठी सूर्यदत्तमध्ये सातत्याने उपक्रम राबवले जातात. राष्ट्राची सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांना संस्थेत बोलावून त्यांची मार्गदर्शन सत्रे घेतली जातात. आजवर एअरमार्शल भूषण गोखले, पोलीस अधीकारी किरण बेदी, भानुप्रताप बर्गे यांच्यासह अनेक मान्यवरांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. समाजात शांतता प्रस्थापित होण्यासाठी अहिंसेचा मार्ग स्वीकारण्याची, एक-दुसऱ्यांना मदत करण्याची, बंधुभाव जोपासण्याची शिकवण सूर्यदत्त संस्थेत दिली जाते. जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञान विद्यार्थ्यांमध्ये रुजत आहे.”