कोणत्याही शहरातील वीज, रस्ते, पाणी किंवा वाहतुकीच्या समस्या तुम्ही ऐकल्या असतील, पण अमेरिकेतील सर्वात मोठ्या आणि आधुनिक शहरांमध्ये गणले जाणारे न्यू यॉर्क हे उंदरांमुळे हैराण झाले आहे. शहरातील उंदरांची संख्या सातत्याने वाढत असून, त्यावर प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजना अपुऱ्या ठरत आहेत. असा अंदाज आहे की, न्यू यॉर्कमध्ये उंदरांच्या संख्येने 30 लाखांचा आकडा ओलांडला आहे. या समस्येपासून मुक्त होण्यासाठी विषापासून उंदरी पकडण्याचे सापळे आणि कोरड्या बर्फापर्यंतचे सर्व उपाय आजमावले गेले; पण यामध्ये यश आले नाही. सर्व प्रयत्न करूनही उंदरांची संख्या सातत्याने वाढत आहे. विषाच्या वापरामुळे इतर प्राण्यांचा जीवही धोक्यात आला आहे.
उंदीरांचा सुळसुळाट कसा राेखणार?
न्यू यॉर्कमध्ये उंदरांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आता त्यांची नसबंदी करण्याची योजना आखली जात आहे, अशी माहिती समोर आली आहे. न्यूयॉर्क टाईम्सच्या मते, प्राणीसंग्रहालयातून पळून गेलेले एक घुबड गेल्या गुरुवारी मृतावस्थेत आढळले. फ्लाको नावाच्या या घुबडात उंदराचे विष आढळले आहे. त्यानंतर आता उंदरांना विष देऊन मारण्याऐवजी दुसरी पद्धत शोधली जात आहे. त्यातूनच उंदरांच्या नसबंदीचा प्रस्तावही आला आहे. यासाठी गर्भनिरोधक औषधांचा वापर केला जाईल. हा पर्याय इतर पद्धतींपेक्षा खूपच चांगला असल्याचे स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शॉट एब्रेयू यांनी सांगितले आहे.
प्रायोगिक योजनेवर काम सुरू
उंदरांच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी नव्या प्रस्तावाचा एक भाग म्हणून शहराच्या आरोग्य विभागाने पथदर्शी योजनेचे काम सुरू केले आहे. या योजनेंतर्गत नर आणि मादी उंदरांची नसबंदी केली जाईल. यासाठी त्यांना गोळ्या खायला घातल्या जाणार आहेत. शॉट एब्रेयू म्हणाले की, हा प्रयत्न अधिक प्रभावी होईल आणि शहरातील किमान 10 ब्लॉक्स कव्हर करेल. हा प्रयत्न यापुढेही सुरू ठेवला जाईल आणि यशस्वी होईल.
गर्भनिरोधक खारट-चविष्ट चरबीयुक्त गोळे
फॉक्स न्यूजनुसार, उंदरांच्या जन्म नियंत्रणासाठी कॉन्ट्रापेस्ट नावाचे गर्भनिरोधक वापरले जाईल. हे गर्भनिरोधक खारट-चविष्ट चरबीयुक्त गोळे आहेत जे उंदरांच्या वास्तव्याच्य ठिकाणी टाकले जातील. हे औषध मादी उंदरांमधील अंडाशयाच्या निर्मिती बंद करते. तर नर उंदरांमध्ये शुक्राणू पेशींचे उत्पादन थांबते. तज्ज्ञांचे असेही मत आहे की, खारट गोळ्या उंदरांना इतक्या चवदार असतात की ते अन्नाच्या शोधात इतर कुठेही जाणार नाहीत. हे औषध इतर प्राण्यांना किंवा माणसांना धोकादायक नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.