सीएफए इन्स्टिट्यूटकडून उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय दृढ करण्यासाठी मुंबईत पहिल्‍या ऑल-इंडिया युनिव्हर्सिटी राउंडटेबलचे आयोजन

By: Editor_Manas

On: Friday, May 29, 2026 3:02 PM

Google News
Follow Us

मुंबई, मे २०२६: सीएफए इन्स्टिट्यूट या गुंतवणूक क्षेत्रातील व्यावसायिकांच्‍या जागतिक संघटनेने नुकतेच मुंबईतील आपल्या कार्यालयात पहिल्या ऑल-इंडिया युनिव्हर्सिटी राउंडटेबलचे आयोजन केले. फायनान्‍स क्षेत्रातील शिक्षणाचे भविष्य आणि जागतिक गुंतवणूक क्षेत्राच्या बदलत्या गरजांनुसार शैक्षणिक रचनेत सुधारणा करणे या विषयांवर चर्चा करण्यासाठी देशभरातील युनिव्‍हर्सिटीजमधील शैक्षणिक प्रमुख या परिषदेत एकत्र आले होते.

या परिषदेची मुख्य संकल्पना ‘सीएफए अभ्यासक्रमाला आकार देणारे पैलू आणि कौशल्य विकास उपक्रम’ होती. यामध्ये कौशल्य-आधारित शिक्षण, अभ्यासक्रमाची आधुनिक रचना आणि शैक्षणिक क्षेत्र व उद्योग जगतातील जवळचा समन्वय या वाढत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकण्यात आला. सीएफए इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ प्रतिनिधी – प्रॉडक्ट मॅनेजमेंटच्‍या डायरेक्‍टर व्हिटनी कॉगेशल आणि सीएफए प्रोग्रामच्या सीनियर हेड ॲनी फॅलग्रीन यांच्या नेतृत्वाखाली हे सत्र पार पडले. वेगाने बदलणाऱ्या व्यावसायिक वातावरणात विद्यार्थ्यांना अधिक सक्षम कसे बनवता येईल, यावर विचारविनिमय करण्यासाठी या सत्राने उत्तम व्यासपीठ मिळवून दिले.

या गोलमेज परिषदेतील चर्चा प्रामुख्याने सीएफए इन्स्टिट्यूटच्या कौशल्य-आधारित शिक्षण उपक्रमाभोवती केंद्रित होती. हा नाविन्यपूर्ण दृष्टिकोन आहे, ज्याचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी लागणारे कौशल्य आणि नियोक्त्यांच्या अपेक्षांनुसार शिक्षण व मूल्यमापन उपलब्ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. बाजारपेठेतील प्रत्‍यक्ष कामासाठी तयार असणाऱ्या प्रतिभावान तरुणांची वाढती मागणी पूर्ण करणे, शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि गुंतवणूक क्षेत्रातील या उपक्रमाचे सातत्यपूर्ण महत्त्व टिकवून ठेवणे या उद्देशाने या उपक्रमाची रचना करण्यात आली आहे.

उमेदवारांची निवड करताना फक्त पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांच्याकडील प्रत्यक्ष कौशल्य आणि कौशल्यांचे सातत्यपूर्ण अद्ययावतीकरण याला प्राधान्य देण्याच्या बदलत्या ट्रेंडवर सहभागी मान्यवरांनी सखोल चर्चा केली. कंपन्या आता निव्वळ सिद्धांतांवर आधारित ज्ञानापेक्षा प्रत्यक्ष कामाचे प्रात्यक्षिक, व्यावहारिक क्षमता आणि खऱ्या आयुष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याच्या कौशल्याला अधिक महत्त्व देत आहेत, हाच मुख्य निष्कर्ष यातून समोर आला. या संवादादरम्यान मायक्रो-क्रेडेंशियलिंग (लहान कालावधीचे विशेष अभ्यासक्रम), व्यावहारिक शिक्षण पद्धती आणि फायनान्‍स क्षेत्रातील करिअरमध्ये तंत्रज्ञान व एआयचा वाढता वापर यांसारख्या नवीन प्रवाहांवरही प्रकाश टाकण्यात आला.

या सत्रात पुढे निदर्शनास आणण्‍यात आले की, जागतिक पातळीवरील एकसमान दर्जा आणि कडक शिस्त कायम ठेवत सीएफए प्रोग्राम नाविन्यता आणि आपल्या प्रमाणपत्राची विश्वासार्हता यामध्ये समतोल साधत आहे. यासाठी अभ्यासक्रमात व्यावहारिक कौशल्य मॉड्यूल्स, प्रत्यक्ष कामावर आधारित मूल्यमापन आणि स्थिर शिक्षण पद्धतींचा समावेश करण्यात येत आहे.

या गोलमेज परिषदेच्या महत्त्वाविषयी मत व्‍यक्त करत सीएफए इन्स्टिट्यूटचे भारतातील युनिव्हर्सिटी रिलेशन्स मॅनेजर साईम फकीह म्हणाले, “आमची ही पहिलीच ऑल-इंडिया युनिव्हर्सिटी राउंडटेबल होती, ज्‍यामधून शैक्षणिक क्षेत्रासोबत राष्ट्रीय पातळीवर मजबूत संबंध निर्माण करण्याप्रती आणि फायनान्‍स क्षेत्रातील शिक्षणाला उद्योग जगताच्या गरजांशी सुसंगत करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. सीएफए प्रोग्रामसारख्या जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त उपक्रमांमध्ये कौशल्य-आधारित शिक्षणाला चालना देऊन आधुनिक फायनान्‍स क्षेत्रातील करिअरसाठी आवश्यक असणारी व्यावहारिक क्षमता, नैतिक निर्णयक्षमता आणि बदल स्वीकारण्याची स्थिरता विद्यार्थ्यांमध्ये विकसित करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

चंदिगढ युनिव्हर्सिटीचे मॅनेजमेंट विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. निलेश अरोरा म्हणाले, “प्रत्‍यक्ष सीएफए प्रोग्रामच्या अभ्यासक्रम रचनाकारांकडून माहिती मिळाल्यामुळे आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव झाली, ती म्हणजे त्यांना फक्त सिद्धांत शिकवणे नव्हे, तर बाजारपेठेत प्रत्यक्षात मागणी असलेली कौशल्ये देणे. एक प्राध्यापक म्हणून, आपण जे शिकवतो ते विद्यार्थ्यांना खऱ्या जगासाठी खरोखर तयार करते का, असा प्रश्न मला अनेकदा पडायचा. या परिषदेने मला याचे उत्तर आणि अधिक चांगले काम करण्याचे साधन या दोन्ही गोष्टी दिल्या आहेत.”

“उद्योगांच्या ज्या अपेक्षा सीएफए अभ्यासक्रमाला आकार देतात, त्यावर सादरीकरणे खरोखर उत्‍साहवर्धक आणि अतिशय माहितीपूर्ण होती. फायनान्‍स क्षेत्राला आज अत्यंत कुशल व्यावसायिकांची गरज असल्याने माझ्या मते, सीएफए इन्स्टिट्यूटचा हा नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना खऱ्या आयुष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि त्यात यशस्वी होण्यासाठी सक्षम करेल,” असे एक्सआयएम युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ कॉमर्सचे प्राध्यापक आणि डीन पी. के. मोहंती म्‍हणाले.

या गोलमेज परिषदेमध्ये भारतातील अनेक नामांकित संस्थांमधील प्राध्यापक एकत्र आले होते. यामध्ये डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटी, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज – बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, ख्राईस्ट युनिव्हर्सिटी, जैन (डीम-टू-बी युनिव्‍हर्सिटी), मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, वोक्सन युनिव्हर्सिटी, आयएमआय दिल्ली, आयआयटी भुवनेश्वर, आयआयटी खडगपूर, चंदीगड युनिव्हर्सिटी, आसाम डाऊनटाऊन युनिव्हर्सिटी, जिंदाल स्कूल ऑफ बँकिंग अँड फायनान्स (ओ. पी. जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी), लाल बहादूर शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, एक्सआयएम युनिव्हर्सिटी, शिव नादार युनिव्हर्सिटी, बेनेट युनिव्हर्सिटी आणि सेंट जोसेफ कॉलेज ऑफ कॉमर्स यांसारख्‍या संस्थांचा समावेश होता.

या गोलमेज परिषदेत प्रामुख्याने मेहुल बरई, अनिंदिता चक्रवर्ती, शिवी खन्‍ना, नंदन आर., मॅथ्यू व्हर्गीस, योगेश पै पी., दीपक सिंग, मोनिका चोप्रा, डॉ. नरेश चंद्र साहू, अभिजित चंद्रा, अनुरीत कौर, डॉ. निलेश अरोरा, मॉन्जित बोरा, डॉ. शिवांगी गुप्‍ता, पंकज (एलबीएसआयएम), पी. के. मोहंती, देबारती बसू, कपिल कपूर, कृष्णेंदू घोष, कुशल या प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता. तसेच अॅटलस स्किलटेक युनिव्हर्सिटी, के. जे. सोमय्या कॉलेज, पी. डी. हिंदुजा कॉलेज, पोद्दार इन्स्टिट्यूशन्‍स, जय हिंद कॉलेज आणि केईएस इन्स्टिट्यूशन्‍समधील प्राध्यापकही सहभागी झाले होते.

शैक्षणिक क्षेत्र आणि सीएफए इन्स्टिट्यूट यांच्यात अधिक दृढ सहयोग निर्माण करण्याच्या संधींवरील परस्पर संवादासह या सत्राची सांगता झाली. यामध्ये अभ्यासक्रमाची सांगड घालणे, प्राध्यापकांचा सहभाग वाढवणे आणि विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता व करिअरची पूर्वतयारी सुधारण्यावर केंद्रित असलेल्या उपक्रमांचा समावेश होता.

ऑल-इंडिया युनिव्हर्सिटी राउंडटेबल सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून सीएफए इन्स्टिट्यूट भारतातील युनिव्‍हर्सिटीजसोबत आपले संबंध अधिक दृढ करत आहे. ज्यामुळे जागतिक स्तरावर महत्त्वाच्या, नैतिक आणि भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज अशा फायनान्‍स क्षेत्रातील व्यावसायिकांच्या विकासाला गती मिळत आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now