पुणे: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती महोत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज सुधारक पुरस्कार ‘ डॉ. कुमार सप्तर्षी यांना प्रदान करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पुर्वसंध्येला म्हणजे दि.१३ एप्रील २०२४ रोजी सायंकाळी हा पुरस्कार आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते मुरलीधर जाधव यांच्या हस्ते देण्यात आला. जमियत उलमा ई हिंद चे अध्यक्ष मोहम्मद कारी इद्रिस आणि रिपब्लिकन युवा मोर्चा च्या अध्यक्ष सुवर्णा डंबाळे , समितीचे अध्यक्ष राहुल डंबाळे, कार्याध्यक्ष शैलेंद्र मोरे, उत्सव प्रमुख नागेश भोसले, उपाध्यक्ष संजय आल्हाट,जांबुवंत मनोहर, संदीप बर्वे,आदी मान्यवर उपस्थित होते.सूत्रसंचालन शैलेंद्र मोरे यांनी केले.आभार जुबेर मेमन यांनी मानले.गांधी भवन , कोथरुड येथे हा कार्यक्रम झाला.या पुरस्काराचे हे पहिलेच वर्ष आहे.
मुरलीधर जाधव म्हणाले, ‘पूर्वी आंबेडकर चळवळी समोरील शत्रू हे मनुस्मृतीच्या रुपात समोर होते,आताचे शत्रू हे सोशल मीडियाचा रूपात आहेत,त्यामुळे आजचे आव्हान मोठे आहे.आजच्या सरकारला घटना बदलण्यासाठी चारशे पार खासदार हवे आहेत, राहुल डंबाळे म्हणाले,’गांधी आणि आंबेडकर यांच्या विचारांचा कालानुरुप समन्वय डॉ.कुमार सप्तर्षी यांच्या कार्यात आहे. त्यामुळे समितीचा पहिल्या वर्षीचा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे’.या वेळी इद्रीस कारी ,जांबुवंत मनोहर यांचीही भाषणे झाली.
सत्काराला उत्तर देताना डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले,’महात्मा गांधी आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभ्यासाने सामाजिक दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या योग्य-अयोग्य याचे विश्लेषण करून निर्णय घेता येतात. सध्या ब्राह्मणवादालाच हिंदुत्व म्हणणारे हे सरकार घालवणं हेच राजकीय दृष्ट्या योग्य आहे.त्यामुळे सर्व भारतीयांनी हे सरकार घालवण्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे.कुणी जातीचा, धर्माचा अभिमान बाळगत असेल तर त्याची खऱ्या भारतीयांना दुर्गंधी येते, कंटाळा येतो, तेव्हा सर्वांनी खरं मानवता धर्म आणि भारतीय जात मानण्यातच शहाणपण आहे’.संविधानाने सन्मानाने जगण्याचा हक्क प्रत्येक भारतीयाला दिलेला आहे , या हक्कावर गदा आल्यास एकटा व्यक्ती याचिका दाखल करू शकतो, ही बाबासाहेबांची दूरदृष्टी होती’.