विठुरायाच्या गजरात निघाला दिंडी सोहळा

नवी मुंबई : विठुनामाचा जयघोषात वारकऱ्यांची दिंडी मिरवणूक काढण्यात आली. तसेच ओंकार जप, अभिभाषण, अग्निहोत्र, संगीत मैफल असा भव्यदिव्य आध्यात्मिक कार्यक्रम आज वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथे पार पडला.

‘सकाळ’, श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅम आयोजित श्रीगुरू पादुका उत्सवात राज्यभरातील भक्तांची मांदियाळी होती. महाराष्ट्र, पंजाब येथील १८ श्रीगुरूंच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची झुंबड उडाली होती. उद्या शुक्रवारीही भाविकांना या पादुकांचे मनोभावे दर्शन घेता येणार आहे.

‘सकाळ भवन’ येथे पहाटे या पादुकांचे पूजन व काकड आरती करण्यात आली. त्यानंतर या पादुका वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटर येथे भावपूर्ण वातावरणात आणण्यात आल्या. विठुनामाचा जयघोष, ढोलताशांच्या गजरात या श्रीगुरू पादुकांचे स्वागत करण्यात आले.

या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून भाविक सकाळीच नवी मुंबईत पोहोचले होते. दर्शनासाठी आतुर असलेल्या भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीने रांगा लावल्या. त्या वेळी भाविकांकडून पांडुरंगाचा जयघोष केला जात होता.

कधी एकदाचे श्रीगुरू पादुकांचे दर्शन होते अशी ओढ भाविकांना लागली होती. हातात फुलांच्या पाकळ्या घेऊन श्रद्धेने श्रीगुरू पादुकांचे दर्शन भाविकांनी घेतले. दर्शनानंतर भाविकांनी चिंतन, मनन या भागातील ज्ञानमार्ग, भक्तिमार्ग, कर्म आणि सेवा मार्ग तसेच लक्ष्मी मार्ग येथील स्टॉलना भेट देऊन श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅमबाबत माहिती घेतली. त्यानंतर भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

त्यानंतर रिंगण सोहळा, सायंकाळी श्री फॅमिली गाईड प्रोग्रॅमच्या चीफ क्युरेटर स्टेफिनी फाईट यांचे प्रास्ताविक, ‘आयुर्वेद संतुलन’चे व्‍यवस्थापकीय संचालक सुनील तांबे यांचे ओंकार जप, डॉ. पुरुषोत्तम राजिमवाले यांचे अग्निहोत्र, धुनी प्रज्वलन, सकाळ माध्यम समूहाचे व्‍यवस्थापकीय संचालक अभिजित पवार यांचे अभिभाषण, आध्यात्मिक गुरू श्री एम यांचे व्याख्यान आणि रात्री हरिहरन यांचा सांगीतिक कार्यक्रम पार पडला.

राजकारणी, सिनेकलाकारांची उपस्थिती

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवाला राज्यभरातील गुरुसेवकांसह राजकारणी, सिनेकलाकार यांनीही उपस्थिती लावली. मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे, उद्योगमंत्री उदय सामंत, ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के तसेच अभिनय क्षेत्रातील मनोज जोशी,

मिलिंद गवळी, कश्यप परुळेकर, स्मिता शेवाळे, मीता सावरकर, पूर्वा पवार, मायरा वायकूळ, नम्रता संभेराव, संगीतकार अविनाश चंद्रचूड आणि इतर अनेक मान्यवरांनी भेट दिली आणि श्रीगुरू पादुकांचे दर्शन घेतले. या वेळी सर्वांनी आपण या सोहळ्याचा भाग होऊ शकलो याबाबत आनंद व्‍यक्त केला आहे.

अठरा पादुकांच्या दर्शनासाठी जाणे शक्य झाले नसते. त्यामुळे एकाच ठिकाणी माहात्म्यांच्या पादुकांचे दर्शन हा दुर्लभ योग आहे. यामुळे सर्व ठिकाणी दर्शनासाठी जाण्याचा खर्च आणि वेळ वाचत आहे, त्याबद्दल खूप खूप आभार.

– माधुरी सावंत, सांगोला

गर्दीमुळे पादुकांवर डोके ठेवून दर्शन घेता येत नाही. या ठिकाणी गुरुसेवकांच्या दर्शनासाठी उत्तम व्‍यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मनासारखे दर्शन झाले.

– मनीषा पाटील, स्वामी समर्थ केंद्र, दिंडोरी, नाशिक

सध्या ऊसतोडणी सुरू आहे. आम्ही शेतकरी वारकरी असून २१ जण स्वखर्चाने दर्शनासाठी आलो आहोत. राज्यातील सर्व ठिकाणी आम्ही गेलो, परंतु असा योग या ठिकाणीच जुळून आला आहे.

– शिवाजी मोरे, कोल्हापूर विठ्ठल-रखुमाई भजनी मंडळ

आम्ही संभाजीनगरमधून आलो आहोत. हा सोहळा ‘याचि देही याचि डोळा’ पाहण्यासाठी आणि त्याचे साक्षीदार होण्यासाठी कुटुंबासह नवी मुंबईत आलो आहोत. एकाच छताखाली संतांचे दर्शन घेण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.

– योगेश चव्हाण, संभाजीनगर

आम्हाला एकाच ठिकाणी राज्यभरातील संतांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभले आहे. आर्थिक म्हणा किंवा कामाच्या व्यापामुळे एकाच दिवशी संतांच्या पादुकांचे दर्शन घेणे दुर्मिळच म्हणावे लागेल. अठरा संतांच्या पादुका एकाच वेळी नवी मुंबईत येणे हे या शहरासाठी भाग्याचे क्षण आहेत.

– शांतिलाल पाटील, नवी मुंबई

रोजच्या धकाधकीच्या जीवनात इच्छा असूनही तीर्थस्थळांना भेट देता येत नाही. नवी मुंबईतील वाशी येथे अठरा पादुकांचे दर्शन मिळणार असल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे.

– मृणाल हुले, नवी मुंबई

श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्यामुळे हा अनोखा योग जुळून आला आहे. नागरिकांना एकाच ठिकाणी १८ पादुकांचे दर्शन मिळत असल्याने गुरुसेवकांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे.

– पाटील बुवा दाते, नवी मुंबई

श्रीगुरू पादुका दर्शन उत्सवासाठी पुण्याहून तीन बस घेऊन आलो आहे. गुरुमाऊलींच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेऊन धन्य झालो. कार्यक्रम एकदम छान झाला. मनाला समाधान मिळाले. दर्शनानंतर महाप्रसाद घेऊन फार बरे वाटले.

– ॲड. सोमेश वैद्य, सामाजिक कार्यकर्ते

हा फार अद्‍भुत सोहळा आहे. एकाच छताखाली संत-माहात्म्यांच्या १८ पादुकांचे दर्शन करण्याचा सोहळा हा अवर्णनीय असाच आहे.

– योगेश देशपांडे, पुणे ऋग्वेद

सर्व धर्मांतील आध्यात्मातून मिळणारी सर्व प्रकारची ऊर्जा ही पवित्र आहे. त्यामध्ये भेसळ नाही. पुरातन ग्रंथात सव्वा लाख दूतांचा उल्लेख आहे. हे दूत आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आज इंटरनेट आहे; पण माणसे इंटरकनेक्ट होत नाहीत. आपली हृदये एक होणे गरजेचे आहे. त्यासाठी अशा संतरूपी दूतांची, त्यांच्या विचारांची गरज आहे.