शक्कल लढवत नको तिथे लपवले 19 कोटींचे कोकेन; परदेशी महिलेला अटक

एका परदेशी महिलेला मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेनसह अटक करण्यात आली. डीआरआयचे अधिकाऱ्यांनी महिलेच्या सामानाची तपासणी केली असता सुमारे 19 कोटी रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले. तिने ड्र्ग्स लपवण्यासाठी केलेली युक्ती पाहून अधिकारीही अवाक् झाले.

मुंबई विमानतळावर एका परदेशी महिला प्रवाशाला कोट्यवधींच्या कोकेनसह अटक करण्यात आली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ही कारवाई केली. या परदेशी महिलेकडून 19 कोटी 79 लाख रुपयांचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेली महिला नैरोबीहून मुंबई विमानतळावर आली होती. तिने कोकेन लपवण्यासाठी जी युक्ती केली ती पाहून अधिकारीही अवाक् झाले. त्या महिलेवे चक्क बूट, मॉयश्चरायझरची बाटली तसेच शांपू आणि डिओड्रंटच्या बाटलीमध्ये कोकेन लपवले होते. अधिकाऱ्यांनी तिच्या सामानाची तपासणी केली असता, हा सर्व प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सर्व माल जप्त केला तसेच महिलेलाही अटक केला.

दोन किलो कोकेन लपवून आणले

मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर या परदेशी महिलेच्या सामानाची झडती घेण्यास सुरुवात केली. तिच्या सामानात त्यांना कोट्यवधींचे कोकेन विविध वस्तूंमध्ये लपवल्याचे आढळले. नंतर या सर्व वस्तूंची कसून तपासणी केली असता महिलेच्या पिशवीतून काढलेल्या वेगवेगळ्या बाटल्या आणि शूजमधील पांढरी पावडर तपासली असता ती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. महिलेच्या बॅगेतून सुमारे 1.979 किलो कोकेन जप्त करण्यात आले

19 कोटींचे कोकेन जप्त

या महिलेच्या बॅगमधून जप्त करण्यात आलेल्या या कोकेनची आज बाजारातील किंमत साधारणत: 19.79 कोटी रुपये इतकी आहे. यानंतर त्या महिलेला अटक करण्यात आली. डीआरडीआयच्या अधिकाऱ्यांनी तिची चौकशी केली. त्यानंतर तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.