राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्ष बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा

Pune News : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासह मित्र पक्षाच्या उमेदवारांना अधिकाधिक मतदान कसे होईल, त्यांचीही मते कशी मिळतील, कोणावर कोणत्या जबाबदाऱ्या सोपवाव्यात, जाहीरनाम्यात कोणत्या स्थानिक प्रश्‍नांना प्राधान्य द्यावे ?

अशा विविध मुद्‌द्‌यांचा आढावा घेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा करण्यात आली. बैठकीत पदाधिकाऱ्यांनी विजय शिवतारे यांच्याकडून होणाऱ्या टीकेला आवर घालण्याची मागणी केली, त्यावर “मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातले आहे, ते प्रश्‍न सोडवतील’ असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे मंगळवारी पक्षाचे मंत्री, आमदार, खासदार, प्रवक्ते यांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे,

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, कृषी मंत्री धनंजय मुंडे, युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्यासह विविध जिल्ह्यांमधील आमदार, खासदार, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी पवार यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या सूचना ऐकून घेतल्या. त्यानंतर पवार व तटकरे यांनी उपस्थितांना प्रचाराची रूपरेषा समजून सांगितली.

तटकरे यांनी बैठकीची पार्श्‍वभूमी सांगितली. तटकरे म्हणाले, “” पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री, प्रवक्ते यांच्यावर लोकसभा मतदारसंघांच्या जबाबदाऱ्या निश्‍चित करण्यात आल्या. विधानसभा मतदारसंघाच्याही जबाबदाऱ्यांचे वाटप केले.

प्रमुख नेते, स्टार प्रचारक हे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये उतरणार आहेत. त्यासाठी मतदारसंघातही प्रचाराची यंत्रणा राबविण्यात आली आहे. या बैठकीत महत्त्वाच्या सूचना काही पदाधिकाऱ्यांनी केल्या. त्यांचा अंतर्भाव पक्षाच्या कार्यक्रमात केला जाणार आहे. अर्ज भरण्याचा प्रक्रियेस उद्या सुरवात होत असून पाच टप्प्यात निवडणूक होत आहे. बुधवारी ही पवार यांची बैठक होणार आहे. त्यामध्ये कार्यकर्त्यांशी चर्चा केली जाणार आहे.”

महादेव जानकरांच्या बातम्या विरोधी गटाने पेरल्या – तटकरे

आमच्यावर प्रेम करणाऱ्या विरोधी गटाच्या मंडळीना सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची भीती वाटत आहे. त्यामुळे या गटानेच बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत महादेव जानकर यांच्या बातम्या पेरल्या आहेत,

अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. तर जानकर महायुती सहभागी झाले असून त्यांना कुठला मतदारसंघ द्यायचा, याची घोषणा दोन दिवसात होईल, असेही त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

तटकरे म्हणाले,

– नाशिक लोकसभेसाठी छगन भुजबळ यांनी चर्चा करणे हा त्यांचा अधिकार

– साताऱ्याच्या जागेबाबत आमची चर्चा सुरू आहे

– शिवाजीराव आढळराव पाटील हे सक्षम उमेदवार आहेत

– जागा वाटप, अदलाबदलीबाबत आमची चर्चा सुरू आहे

– राजकारणात सर्व शक्‍यता असू शकतात