काँग्रेसची पाचवी यादी जाहीर; जाणून घ्या कोणत्या दिग्गज नेत्याचे नाव वगळले

नवी दिल्ली : काँग्रेसने आज (दि. २५) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजस्थान मधील चार आणि तामिळनाडूमधील एक अशा पाच उमेदवारांची यादी घोषित केली. यामध्ये राजस्थानच्या अजमेर लोकसभा मतदारसंघातून रामचंद्र चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली. अजमेर हे काँग्रेस नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचे प्रभावक्षेत्र आहे. त्यामुळे सचिन पायलट या ठिकाणाहून निवडणुकीला उभे राहतील, अशा चर्चा होत्या. मात्र सचिन पायलट लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात नसणार हे या निमित्ताने स्पष्ट झाले.

लोकसभेत जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी काँग्रेसने आपल्या वरिष्ठ नेत्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचे ठरवले होते. काँग्रेसच्या याच रणानितीचा भाग म्हणून छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भुपेश बघेल, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत, सचिन पायलट हे नेते लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या. मात्र अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली त्यामुळे स्वाभाविकच अशोक गेहलोत यांचे नाव मागे पडले. परंतु सचिन पायलट लोकसभेच्या रिंगणात उतरतील अशा चर्चा होत्या. अखेर अजमेर मधून रामचंद्र चौधरी यांचे नाव जाहीर झाल्याने सचिन पायलट हे लोकसभेच्या रिंगणात नसतील हे स्पष्ट झाले.

सोमवारी काँग्रेसने जाहीर केलेल्या पाचव्या यादीत राजस्थानच्या अजमेर मधून रामचंद्र चौधरी तर राजसंमंदमधून सुदर्शन रावत, भिलवारामधून डॉ. दामोदर गुर्जर तर कोटामधून प्रल्हाद गुंजाळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सोबतच तामिळनाडूच्या तीरूनवेली मतदारसंघातून सी. रॉबर्ट ब्रूस यांना उमेदवारी देण्यात आली आहे.