पुणे, मार्च २०२४: युनायटेड अरब अमिराती मध्ये जाणारे फोनपे ॲप युजर आता निओपे टर्मिनल्सवर युपीआय वापरून पेमेंट करू शकणार असून हा पेमेंट पर्याय रिटेल स्टोअर्स, डायनिंग आउटलेट्स तसेच पर्यटन आणि मनोरंजनसंबंधित ठिकाणी उपलब्ध आहे. हे पेमेंट विनादिक्कत आणि झटपट होण्यासाठी फक्त क्यूआर केड स्कॅन करावा लागणार आहे. हे व्यवहार युनायटेड पेमेंट्स इंटरफेसतर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहेत. खात्यातून भारतीय रुपयामध्ये रक्कम डेबिट होणार असून यासोबत चलन विनिमय दर दाखवण्यात येईल.
याव्यतिरिक्त, युएई मोबाईल नंबर असलेले एनआरआय देखील फोनपे ॲप डाउनलोड करू शकतात आणि सहज पेमेंट करण्यासाठी त्यांची सध्याची एनआरई आणि एनआरओ खाती लिंक करू शकतात.युएई मधील भारतीयांसाठी आर्थिक व्यवहार सुलभ व्हावेत, हा यामागचा उद्देश आहे.या भागीदारीच्या माध्यमातून निओपे टर्मिनल्सना युपीआय ॲप पेमेंट इन्स्ट्रुमेंट म्हणून स्वीकारण्यासाठी सक्षम केले आहे. यामुळे युएई मधील भारतीयांना व्यवहारांसाठी युपीआय अधिक सोयीस्करपणे वापरता येईल.
भागीदारीबद्दल बोलताना फोनपे चे आंतरराष्ट्रीय पेमेंट विभागाचे सीईओ रीतेश पै म्हणाले, युएई हे प्रसिद्ध डेस्टिनेशन असून दर वर्षी लाखो भारतीय तेथे प्रवास करतात. या भागीदारीमुळे, ग्राहकांच्या सवयीच्या असलेल्या युपीआय पेमेंट पद्धतीच्या माध्यमातून ते सोयीस्कररीत्या व्यवहार करू शकतील. डिजिटल पेमेंट सुरू केल्याने ग्राहकांना सोयीस्कर असलेल्या सुविधा देण्याच्या फोनपे च्या कटीबद्धतेला आधार मिळतो. इतकेच नव्हे तर, आजकालच्या आधुनिक प्रवाश्यांच्या वाढत्या गरजांची पूर्तताही त्यामुळे सहजसाध्य होते. ही भागीदारी विनादिक्कत आर्थिक व्यवहारांची हमी देते आणि परिणामी प्रवाश्यांचा प्रवास अधिक आनंददायी होण्याचीही खात्री बाळगता येते.’’
निओपेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विभोर मुंधडा म्हणाले, ‘‘युएई मधील भारतीय पर्यटक आणि व्हिजिटर्ससाठी आणखी एक नवीन पेमेंट सोल्यूशन सादर करण्यासाठी फोनपे सह भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहे. यामुळे दोन्ही देशांतील आधीच घट्ट असलेले आर्थिक संबंध आणखी मजबूत होण्यास मदत होईल. आमच्या या नवीन प्रकल्पामुळे आमच्या परिचालनात नाविन्य आणि तंत्रज्ञानाचा समावेश करून आमच्या ग्राहकांना हवे असलेली सोल्यूशन आणि अनुभव देण्याचे आमचे वचन अधोरेखित होते.’’ प्रवास आणि स्थानिक व्यवहार सोपे करण्याव्यतिरिक्त, इनवर्ड रेमिटन्ससाठी कॉरिडॉर सक्षम झाल्यानंतर फोनपे तर्फे इनवर्ड रेमिटन्स सेवाही सुरू करण्यात येईल. यामुळे युपीआय सुविधांचा लाभ घेऊन पैसे ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सोपी होणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बँक खाते क्रमांक आणि आयएफएससी कोड यांसारख्या तपशीलांची आवश्यकताच यामुळे नाहीशी होईल.