पुणे : “मार्च-एप्रिल महिन्यात लेखापरीक्षणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरु असते. बँकांचे लेखापरीक्षण गुणवत्तापूर्ण व पारदर्शक होण्यात सनदी लेखापालांची भूमिका महत्वपूर्ण असते. बँकिंग क्षेत्रात नवीन लोकांचा, तंत्रज्ञानाचा अंतर्भाव आणि नियमात होणारे बदल लक्षात घेता अशा स्वरूपाच्या परिषदांचे आयोजन उपयुक्त ठरते,” असे बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक आशिष पांडे यांनी व्यक्त केले.
दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या (आयसीएआय) ऑडिटिंग अँड अश्युरंस स्टँडर्ड बोर्ड आणि आयसीएआय पुणे शाखेच्या वतीने ‘बँक ब्रँच ऑडिट’वर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनावेळी आशिष पांडे बोलत होते. प्रसंगी ‘आयसीएआय’च्या केंद्रीय समितीचे सदस्य सीए चंद्रशेखर चितळे, आयसीएआय पुणे शाखेच्या अध्यक्षा सीए अमृता कुलकर्णी, उपाध्यक्ष सीए सचिन मिणियार, सचिव सीए ऋषिकेश बडवे, खजिनदार सीए मोशमी शहा, कार्यकारिणी सदस्य सीए अजिंक्य रणदिवे आणि सीए राजेश अग्रवाल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
आशिष पांडे म्हणाले, “लेखापरीक्षणात दृश्य व अदृश्य गोष्टींचा समावेश असतो. लेखापरीक्षण लवकर व अचूक होण्यासाठी बॅंक कर्मचारी आणि लेखापालन कर्मचारी यांच्यात समन्वय असावा. नवीन तंत्रज्ञान, क्लोझिंग सॉफ्टवेर आदी गोष्टी प्रशिक्षणावेळी सांगितल्या जातात. ब्रँच मॅनेजर नवीन किंवा दुसऱ्या बँकेतून आलेले असतील, तर त्यांनीही आधीच्या गोष्टी समजून घ्याव्यात, प्रशिक्षण घ्यावे. सनदी लेखापालांची आजची पिढी हुशार व तंत्रज्ञानाभिमुख आहे.”
सीए चंद्रशेखर चितळे म्हणाले, “मार्चमध्ये संपूर्ण देशातील बँकांचे लेखापरीक्षण होत असते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवीन नियम, परिपत्रक काढत असते. या बदललेल्या नियम व तांत्रिक गोष्टींविषयी लेखापालांना माहिती व्हावी, यासाठी देशभर ‘आयसीएआय’कडून असे परिसंवाद घेतले जातात.”
सीए अमृता कुलकर्णी म्हणाल्या, “सनदी लेखापालाकडून बँकांना असलेल्या अपेक्षांची पूर्तता, नवतंत्रज्ञान वापरून वेळेत लेखापालन करण्याच्या दृष्टीने ही परिषद उपयुक्त ठरेल. नवीन नियम, लेखापालन करताना येणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना यावर सनदी लेखापालांना मार्गदर्शन मिळेल.”
सूत्रसंचालन सीए मोशमी शहा यांनी केले. सीए ऋषिकेश बडवे यांनी आभार मानले.