शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव पोलिसांची धडाकेबाज कारवाई; गोळीबार करणारे पाच रेकॉर्डवरील गुन्हेगार जेरबंद; तीन गावठी पिस्टलांसह चार जिवंत काडतुसे जप्त

By: Editor_Pratik

On: Saturday, September 12, 2026 10:26 AM

Google News
Follow Us

पुणे : जुन्या भांडणाच्या वादातून तरुणावर गावठी पिस्टलने दोन राउंड गोळीबार करून पसार झालेल्या पाच रेकॉर्डवरील गुन्हेगारांना आंबेगाव पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत जेरबंद केले. आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही धडाकेबाज कारवाई केली. आरोपींकडून तीन गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री साडेएकच्या सुमारास भेंडी चौक, आंबेगाव (बु.), पुणे येथील हरणाई कॉम्प्लेक्सच्या पार्किंगमध्ये फिर्यादीचा मुलगा गाडी पार्क करून घरी जात असताना आरोपींनी त्याला जुन्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ केली. त्यानंतर जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आरोपींनी गावठी पिस्टलमधून त्याच्या दिशेने दोन राउंड फायर केले आणि पिस्टल घेऊन घटनास्थळावरून पसार झाले.

या घटनेप्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गु.र.क्र. ३८०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता, आर्म्स अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायदा आणि क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्टच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे करीत आहेत.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी तपास पथकाला आरोपींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना देत तपासाची सूत्रे प्रभावीपणे हाताळली. पथकाने आरोपींच्या हालचालींबाबत गोपनीय माहिती संकलित केली. तसेच त्यांच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींचा माग काढण्यात आला.

तपासादरम्यान आरोपी दख्खन हॉटेललगत, जांभुळवाडी, पुणे येथे पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून पाचही आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन गावठी पिस्टल आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या प्रकरणात शिवदत्त ऊर्फ सोन्या हरीकाका कोंढरे (२३), श्रेयश रुपेश काटे (२३), सुरज सुभाष डिंबळे (२३), अतिष उमेश मोरे (२८) आणि ऋत्विक ऊर्फ दगडू पांडुरंग बेलदरे (२४) यांना अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्यांना १४ सप्टेंबर २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तांत्रिक विश्लेषणातून आरोपींचा माग

या कारवाईचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, गोपनीय माहितीला तांत्रिक तपासाची जोड देत वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपींचा माग काढला. गुन्ह्यानंतर आरोपी पसार झाले असतानाही त्यांच्या हालचालींचा मागोवा घेऊन त्यांना शस्त्रांसह ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले.

ही कारवाई पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे, पोलीस उपआयुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

कारवाईत पोलीस निरीक्षक (गुन्हे) चांगदेव सजगणे, पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे तसेच पोलीस अंमलदार चेतन गोरे, हणमंत मासाळ, हरीश गायकवाड, निलेश जमदाडे, अवधुत जमदाडे, धनाजी धोत्रे, सचिन गाडे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, प्रमोद भोसले, नितीन कातुर्डे, योगेश जगदाळे, अजय कामठे, सुभाष मोरे, शिवाजी पोटोळे आणि फिरोज शेख यांनी सहभाग घेतला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या शस्त्रधारी गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

For Feedback - puneprahar2018@gmail.com

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now