सौंदर्याच्या पलीकडे: चित्रात देवतेचे पूर्ण रूप असणे
आध्यात्मिक ऊर्जा कशी वाढवते
पूजेचा मुख्य उद्देश ईश्वराप्रती भाव जागृत करणे आणि मनःशांती अनुभवणे हा आहे. पण एखाद्या देवी-देवतेच्या चित्राचा किंवा मूर्तीचा आकार, त्यातील देवतेच्या रूपाचीपूर्णता आणि सात्त्विकता हे ही आध्यात्मिक अनुभूती वृद्धिंगत करू शकतात का?
लाखो भाविक जन्माष्टमीच्या निमित्ताने भगवान श्रीकृष्णाच्या मनमोहक चित्रांनी आणि मूर्तींनी आपल्या घरातील देवघर सजवण्याची तयारी करत आहेत. या सणाचा आपण अधिकाधिक आध्यात्मिक लाभ कसा मिळवू शकतो, हे जाणून घेऊया.
ईश्वरीय स्पंदनांचे विज्ञान
देवी-देवतांच्या चित्रांतून प्रक्षेपित होणाऱ्या आध्यात्मिक ऊर्जेचा अभ्यास करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय’ च्या आध्यात्मिक संशोधन गटाने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’चा वापर केला. हे सकारात्मक आणि नकारात्मक सूक्ष्म ऊर्जांचे मापन करणारे उपकरण आहे. यासाठी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील साधक-कलाकारांनी तयार केलेल्या भगवान श्रीकृष्णाच्या वेगवेगळ्या आकारांच्या पाच चित्रांचा अभ्यास करण्यात आला.
अभ्यासाच्या निष्कर्षांमध्ये असे आढळले की, चित्राचा आकार वाढत गेला तसे त्याची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ (ऑरा) देखील वाढत गेली. 2×3 इंचांच्या सर्वांत लहान चित्राची सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 7.2 मीटर होती, तर 14×19 इंचांच्या चित्रात ती 21 मीटरपर्यंत वाढली. मात्र, सर्वांत मोठ्या 20×27 इंचांच्या चित्रात ही सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ 21 मीटरवरून थेट 220 मीटरपेक्षा अधिक झाली.
यामध्ये केवळ आकारच नव्हे, तर चित्रातील देवतेच्या रूपाची पूर्णता हाही एक महत्त्वाचा घटक होता. पहिल्या चार चित्रांमध्ये श्रीकृष्णांना जानूपर्यंत (गुडघ्यांपर्यंत) दर्शवण्यात आले होते, तर सर्वांत मोठ्या चित्रात त्यांचे चरणांपर्यंतचे संपूर्ण स्वरूप दर्शवण्यात आले होते.
अध्यात्मशास्त्रानुसार, एखाद्या देवतेचे चित्र तिच्या वास्तविक स्वरूपाशी—अवयव, अस्त्रे-शस्त्रे आणि अलंकार यांसह—जितके अधिक साम्य दर्शवते, तितके ते त्या देवतेचे तत्त्व अधिक प्रमाणात आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यास सक्षम असते. यामुळे भक्ताला ईश्वराशी एकरूप होणे आणि अंतर्मनात भाव जागृत करणे अधिक सुलभ होऊ शकते.
सध्याच्या कालखंडात उपलब्ध देवतांच्या चित्रांमध्ये केवळ १-२ % देवतात्तत्व आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्याची क्षमता असते, असे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनातून निष्पन्न झाले आहे. सध्याच्या युगात स्पंदन शास्त्रानुसार एखाद्या साधक-कलाकाराने बनवलेल्या देवतेच्या कलाकृतीमध्ये अधिकतम 30% देवतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता असते. याउलट, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या साधक-कलाकारांनी तयार केलेल्या या चित्रांमध्ये 31% देवतत्त्व आकृष्ट करण्याची क्षमता आढळली. चित्रनिर्मितीच्या वेळी कलाकारांची उच्च भावावस्था आणि चित्रनिर्मिती आपली साधना म्हणून करणे यामुळे हे साध्य झाले.
आपल्या घरात ‘पूर्णावताराचे’ स्वागत
भगवान श्रीकृष्ण पूर्णावतार असल्यामुळे त्याचे अंशतः स्वरूप दर्शवणारी चित्रेही त्याच्या तत्त्वाचे प्रक्षेपण करतात. तरीही, मोठ्या आकाराचे आणि चरणांपर्यंत संपूर्ण स्वरूप दर्शवणारे चित्र ईश्वरीय स्पंदने अधिक व्यापक प्रमाणात प्रक्षेपित कऱते. इतर देवी-देवतांसाठीही चरणांपर्यंतचे संपूर्ण स्वरूप असलेले चित्र सर्वोत्तम असते.
या जन्माष्टमीला भावपूर्वक निर्मित केलेले मोठे, संपूर्ण स्वरूपाचे आणि सात्त्विक चित्र निवडणे हे केवळ सणानिमित्त औपचारिकता न रहाता, आपल्या घरात चैतन्यमय वातावरण निर्माण करण्याचे एक माध्यम ठरू शकते. यामुळे ईश्वराशी अधिक सखोल संबंध प्रस्थापित करणे आणि खरा आंतरिक आनंद अनुभवणे साध्य होईल.
तुम्हाला वेगवेगळ्या आकारांच्या किंवा प्रकारांच्या देवी-देवतांच्या चित्रांसमोर पूजा अथवा ध्यान करताना तुमच्या साधनेत कधी काही फरक जाणवला आहे का?
— सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा
www.spiritual.university





