पुणे : नवरात्रोत्सवात स्त्रीशक्तीचा जागर होत असताना, केवळ मदतीचा हात देण्यापेक्षा स्वावलंबनासाठी संधी उपलब्ध करून देण्याचा प्रेरणादायी उपक्रम जय गणेश व्यासपीठ, पुणे शहर यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.
पुणे रेल्वे स्थानकासह विविध ठिकाणी चिक्की, अगरबत्ती, धूप-वाती, खेळणी आणि कटलरी यांसारख्या वस्तूंची विक्री करून स्वतःचा उदरनिर्वाह करणाऱ्या नऊ दृष्टिहीन महिला उद्योजिकांना विक्रीसाठी आवश्यक साहित्य देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सहकार्याचे तोरण बांधत, त्यांच्या कष्टांचा आणि जिद्दीचा गौरव करणारा हा उपक्रम नवरात्रोत्सवातील स्त्रीशक्तीच्या पूजनाचा एक अनोखा आविष्कार ठरला.
बुधवार पेठेतील साईनाथ मंडळ ट्रस्ट, अरण्येश्वर येथील एकता मित्र मंडळ आणि भवानी पेठेतील श्री शिवाजी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला. या वेळी सर्व महिला उद्योजिकांना औक्षण करून त्यांचे अनोख्या पद्धतीने पूजन करण्यात आले आणि त्यांच्या व्यवसायाला हातभार लावण्यासाठी विक्री साहित्य वितरित करण्यात आले.
सणांचे खरे मांगल्य केवळ पूजेत नसते, तर समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने जगण्याची संधी देण्यात असते. मदतीपेक्षा स्वावलंबनाला बळ देणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचा आणि माणुसकीचा जागर घडवणारा आहे असे मनोगत खटावकर यांनी केले
शिल्पकार विवेक खटावकर, सौ. वैशाली खटावकर, सिद्धेश्वर मंदिराचे विश्वस्त बाळासाहेब पाटोळे आणि कुमार आणवेकर यांच्या हस्ते साहित्याचे वितरण करण्यात आले. या उपक्रमासाठी अद्वैत परिवाराच्या ‘मदत नको, संधी द्या’ या संकल्पनेतून संतोष डिंबळे, सोमनाथ कांबळे, कृष्णा घुले तसेच नगरसेविका शैलजाताई भोसले यांचे विशेष सहकार्य लाभले.
या कार्यक्रमाचे आयोजन पीयूष शाह, प्रल्हाद भाऊ थोरात आणि सुधीर ढमाले यांनी केले. यावेळी नरेंद्र व्यास, ऋत्विक आदमूलवार, गंधाली शाह आणि हेरंब ढमाले उपस्थित होते. पीयूष शाह यांनी प्रास्ताविक केले, तर सुधीर ढमाले यांनी आभार मानले.





