पुणे, दि. १५ ऑक्टोबर २०२६ : भारतभूमी सुजलाम-सुफलाम व्हावी, हे स्वप्न पाहणारे पद्मविभूषण डॉ. मोहन धारिया यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी वनराईच्या पर्यावरण शिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित चित्रकला उपक्रमात पुण्यातील ५० हून अधिक शाळांमधील १५० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. छत्रपती संभाजी महाराज उद्यान, बालगंधर्व, पुणे येथे बुधवारी झालेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी जलसंकट आणि दुष्काळाच्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाची गरज आपल्या चित्रांतून मांडली. यावेळी सुमारे ५० शिक्षक व पालकही उपस्थित होते.
डॉ. मोहन धारिया यांनी वनराईच्या माध्यमातून भारतभूमी सुजलाम-सुफलाम करण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांच्या स्मृतींना उजाळा देतानाच विद्यार्थ्यांमध्ये आजच्या पर्यावरणीय प्रश्नांविषयी जाणीव निर्माण करणे आणि चित्रकलेसारख्या सर्जनशील माध्यमातून त्यांना विचार करण्यास प्रवृत्त करणे, हा या उपक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वनराईचे सचिव मा. अमित वाडेकर यांनी केले. दुष्काळ आणि जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर वनराईच्या पर्यावरण संवर्धन कार्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. जलसंवर्धन, निसर्गाचे संरक्षण आणि पर्यावरणपूरक जीवनशैली यांविषयी समाजात जाणीव निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. अशा उपक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी संवेदनशीलता निर्माण होऊन त्यांना कृतीसाठी प्रेरणा मिळते, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कलाकार मा. रमाकांत धानोकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. चित्रकला हे विचार, भावना आणि सभोवतालच्या परिस्थितीविषयीची निरीक्षणे व्यक्त करण्याचे प्रभावी माध्यम आहे. कल्पनाशक्तीचा वापर करून पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चित्रांतून भाष्य कसे करता येते, याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पुण्यातील अवकाश आर्ट गॅलरीशी संबंधित असलेल्या धानोकर यांच्या संवादातून विद्यार्थ्यांना चित्रकलेच्या अभिव्यक्तीविषयी नवा दृष्टिकोन मिळाला. वनराईचे विश्वस्त मा. सागर धारिया यांनीही उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.
या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना ‘जलसंकट आणि आपण’, ‘जल हेच जीवन’, ‘आमची शाळा : हरित शाळा’ आणि ‘माझ्या परिसरातील जैवविविधता’ हे चार विषय देण्यात आले होते. पाण्याचे महत्त्व, जलसंकटावरील संभाव्य उपाय, शाळेतील पर्यावरणपूरक उपक्रम आणि परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन अशा विविध मुद्द्यांना विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांतून स्पर्श केला. चित्रकलेसाठी आवश्यक कागद, रंग, पेन्सिली, खोडरबर आणि शार्पनर विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले.
वनराईचे पर्यावरण शिक्षण कार्यक्रम समन्वयक बसवंत विठाबाई बाबाराव यांनी विद्यार्थ्यांच्या सहभागातून लोकजागृती घडवून आणण्याच्या महत्त्वावर भर दिला. भारतभूमी सुजलाम-सुफलाम करण्याचे डॉ. मोहन धारिया यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आजच्या पिढीवरही आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या चित्रांमधून पर्यावरणविषयक संदेश मित्रांपर्यंत, कुटुंबापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचवावा. अशा लोकजागृतीतून जलसंवर्धन आणि पर्यावरण संरक्षणासाठी व्यापक जनसहभाग निर्माण होऊ शकतो, असे मत त्यांनी व्यक्त केले.
चित्रकला पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी जलसंकटाच्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी आणि पाण्याचे संवर्धन करण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करण्याचा संकल्प केला. विद्यार्थ्यांना पर्यावरणविषयक प्रश्नांवर विचार करण्याची आणि कलात्मक अभिव्यक्तीतून सामाजिक संदेश देण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल शिक्षक व पालकांनी वनराईच्या या उपक्रमाचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे नियोजन, आयोजन आणि समन्वय बसवंत विठाबाई बाबाराव यांनी केले. वनराईच्या प्रकाशन विभागातील श्री. दत्ता टेमघीरे आणि स्वामी खोपडे यांनीही कार्यक्रमाच्या आयोजनात मोलाची भूमिका बजावली.
शाश्वत भविष्यासाठी विद्यार्थ्यांचा चित्रकलेच्या माध्यमातून पुढाकार, हा या उपक्रमाचा मुख्य संदेश ठरला.





