भोकर : स्वतःच्या दोन निष्पाप मुलांची हत्या करून त्यांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी भोकर येथील सत्र न्यायालयाने आरोपी आईला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
ही घटना भोकर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पांडुर्णा शिवारात घडली होती. आरोपी धुरपताबाई गणपत निमलवाड (वय २९, रा. पांडुर्णा, ता. भोकर, जि. नांदेड) हिने आपल्या चार महिन्यांच्या मुलगी अनुसया आणि दोन वर्षांच्या मुलगा दत्ता यांचा जीव घेतल्याचा आरोप होता. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही मुले सतत रडत असल्याने संतापाच्या भरात आरोपीने मुलगी अनुसयाचे तोंड दाबून तिचा खून केला आणि मृतदेह पुलाखाली पुरला. तसेच मुलगा दत्ता याच्या नाका-तोंडात चिखल टाकून त्यालाही ठार मारून मृतदेह मुगट शिवारातील उसाच्या शेताजवळ टाकण्यात आला होता.
यानंतर आरोपीने इतरांच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचेही तपासात निष्पन्न झाले. या प्रकरणी मुलांचे आजोबा गोविंद दादुजी निमलवाड (वय ८५) यांनी भोकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता सौ. अनुराधा रेड्डी (डावकरे) यांनी सहा साक्षीदार तपासून परिस्थितीजन्य पुरावे न्यायालयासमोर मांडले. आरोपीला तिच्या कृत्याची पूर्ण जाणीव असल्याचा युक्तिवादही करण्यात आला.
सत्र न्यायाधीश मोहम्मद नासीर मोहम्मद सलीम यांनी आरोपीच्या मानसिक स्थितीचा आणि वैद्यकीय अहवालांचा विचार करून भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ ऐवजी कलम ३०४ (भाग-२) अंतर्गत पाच वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंड, तसेच कलम २०१ अंतर्गत दोन वर्षांची शिक्षा व एक हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.
दरम्यान, या प्रकरणातील आरोपीची आई कोंड्याबाई पांडुरंग राजेमोड (वय ५०) आणि भाऊ माधव पांडुरंग राजेमोड (वय २५, रा. ब्राह्मणवाडा, ता. मुदखेड) यांना सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पाटील यांनी पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी अधिकारी एएसआय फिरोजखान पठाण यांनीही या खटल्यात महत्त्वाची भूमिका बजावली.





