पुणे, दि. ६ जुलै : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे भीषण दुर्घटना घडली आहे. विसापूर किल्ल्याच्या परिसरातील दरड कोसळून पाटण गावातील एका घरावर माती आणि दगडांचा मोठा ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत नंदू तिकोणे यांचे संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत एका व्यक्तीचा मृतदेह हाती लागल्याची माहिती समोर आली आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ही घटना घडली. माहिती मिळताच मावळचे तहसीलदार, महसूल प्रशासन, पोलीस तसेच स्थानिक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (एनडीआरएफ) पुणे येथील पाचव्या बटालियनची मदत मागविण्यात आली.
निरीक्षक रविंदर यांच्या नेतृत्वाखाली आणि सहाय्यक कमांडंट चंद्रकेतू शर्मा यांच्या देखरेखीखाली एक अधिकारी, दोन वरिष्ठ अधिकारी आणि २७ जवानांसह एकूण ३० सदस्यांचे पथक आवश्यक बचाव साहित्य घेऊन सकाळी सुमारे ५.५० वाजता घटनास्थळी रवाना झाले. सध्या ढिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
पहाटे काही मिनिटांत घडली दुर्घटना
अतिवृष्टीमुळे विसापूर किल्ल्याच्या उतारावरील माती खचून मोठा भाग पाटण गावाच्या दिशेने घसरला. प्रत्यक्षदर्शी अक्षय भोसले यांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे चारच्या सुमारास त्यांनी तिकोणे यांचे घर पाहिले होते. मात्र अवघ्या काही मिनिटांत मोठा स्फोट झाल्यासारखा आवाज झाला आणि संपूर्ण घर मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले.
स्थानिक रहिवासी पंकज यांनी सांगितले की, या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड दहशत पसरली आहे.
घाटमाथ्यावर विक्रमी पावसाची नोंद
पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर गेल्या २४ तासांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. लोणावळ्यात सकाळी ६.३० वाजेपर्यंतच्या २४ तासांत तब्बल ६७० मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय भिरा येथे ६०९ मिमी, ताम्हिणी घाटात ५८० मिमी, मावळ तालुक्यातील शिरगाव येथे ५४० मिमी, लोणावळा–लवासा मार्गावरील आंबोशी येथे ५३७ मिमी, तर खोपोली येथे ५१६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगर उतारावरील गावांमध्ये दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. बचावकार्य सुरू असून अधिकृत माहिती येताच पुढील तपशील जाहीर केला जाणार आहे.





