प्रतिनिधी – मानस : पुणे शहर आणि परिसरात ‘एमडी’ (मॅफेड्रोन) ड्रग्ज तयार करण्यासाठी कारखाना सुरू करण्याचा डाव वाघोली पोलिसांनी उधळून लावला आहे. या प्रकरणात पोलिसांनी मुख्य सूत्रधारासह आठ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून २२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज, आलिशान मोटारी आणि अन्य साहित्य असा तब्बल एक कोटी १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये सुमीत अशोक घुले, अनिस शम्मू सय्यद, हरी उत्तम उफाडे, प्रतीक उर्फ सोन्याबापू होले, ऋषिकेश उर्फ राम यनभर, रामनिवास रानूराम बिश्नोई, आकाश अशोक ढवळे आणि बिपिनकुमार श्रीरामसागर पंडित यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केसनंद येथील जोगेश्वरी वजनकाटा परिसरात कारवाई करताना अनिस सय्यद आणि हरी उफाडे यांना पाच ग्रॅम एमडीसह ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तपासाचा विस्तार करताना या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार सुमीत घुले असल्याचे समोर आले.
पोलिसांचा माग कळताच सुमीत घुले फरार झाला होता. मात्र, तांत्रिक तपास आणि माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला अहमदाबाद येथून अटक केली. तपासात घुले हा आकाश ढवळेच्या मदतीने पुणे शहर आणि ग्रामीण भागात ड्रग्ज विक्री करत असल्याचे उघड झाले.
विशेष म्हणजे, कुरकुंभ ड्रग्ज प्रकरणातील आरोपी बिपिनकुमार पंडित हा जामिनावर बाहेर असून, त्याच्या मदतीने ग्रामीण भागात एमडी ड्रग्ज बनविण्याचा कारखाना सुरू करण्याची टोळीची तयारी सुरू होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी कारवाई करून संपूर्ण कट उधळून लावला.
या कारवाईत पोलिसांनी ४५ लाख ६० हजार रुपये किमतीचे २२५ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केले. तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या महागड्या आलिशान गाड्याही ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक नंदकुमार गायकवाड, पोलिस निरीक्षक पल्लवी मेहेर, सहाय्यक निरीक्षक विजय चंदन तसेच प्रदीप मोटे, शेखर शिंदे आणि विशाल गायकवाड यांच्या पथकाने ही धडाकेबाज कारवाई केली.





