पुणे : न्यूयॉर्क येथे संयुक्त राष्ट्रांच्या वार्षिक महिला आयोगाच्या परिषदेत सहभागी होण्यासाठी पुण्यातील वैद्य ईशानी बेंडाळे यांची निवड झाली आहे. जागतिक स्तरावरील या परिषदेत सहभागी झालेल्या वैद्य ईशानी यांच्यामुळे शहराचा सन्मान वाढला आहे. या परिषदेत त्या सलग तिसऱ्यांदा सहभागी होत आहेत. वैद्य बेंडाळे या भारतातील आरोग्य व्यवस्थेतील प्रत्यक्ष अनुभवाच्या आधारे महिलांचे आरोग्य, न्यायप्रवेश आणि समानतेशी संबंधित मुद्दे मांडणार आहेत.
महिलांच्या समानतेसाठी कार्य करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाची वार्षिक परिषद (यूएन सीएसडब्ल्यू७०) ९ ते १९ मार्च या कालावधीत न्यूयॉर्क येथील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात होत आहे. जगभरातील सरकारांचे प्रतिनिधी, धोरणकर्ते आणि नागरी संस्थांचे प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले आहेत.
वैद्य बेंडाळे या मूळच्या पुण्यातील असून, त्यांनी टिळक आयुर्वेद महाविद्यालयातून आयुर्वेद वैद्यकशास्त्रातील पदवी (बीएएमएस) पूर्ण केली. त्यानंतर त्यांनी ब्रिटनमधील स्वानसी विद्यापीठातून नॅनोमेडिसिनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या त्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून ‘पुराव्यावर आधारित आरोग्यसेवा’ या विषयात उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेत २०२३ मध्ये त्यांची ब्रिटिश सोसायटी फॉर नॅनोमेडिसिन संस्थेच्या ‘चॅम्पियन’ म्हणून निवड झाली आहे. मागील वर्षी, त्यांनी ऑक्सफर्ड युनियन या प्रतिष्ठित संस्थेत ‘पाश्चिमात्य स्त्रीवाद आणि ग्लोबल साऊथ’ या विषयावरील चर्चासत्राचे संचालन केले होते.
“संयुक्त राष्ट्रांच्या महिला आयोगाच्या वार्षिक परिषदेत तिसऱ्यांदा सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा मला मोठा सन्मान वाटतो. भारतातील वैद्य किंवा आयुर्वेदिक डॉक्टर म्हणून आरोग्य क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभवातून महिलांच्या आरोग्य, न्यायप्रवेश आणि समानतेशी संबंधित मुद्दे मांडण्याची संधी मिळत आहे. जागतिक स्तरावर स्त्री-पुरुष समानतेबाबत व्यापक संवाद घडवून आणणे आवश्यक आहे. धोरण, प्रत्यक्ष अनुभव आणि जागतिक सहकार्य यांना जोडणाऱ्या चर्चांमध्ये सहभागी होण्याची मी उत्सुक आहे.”
– वैद्य ईशानी बेंडाळे, ऑक्सफर्ड स्कॉलर





