राज ठाकरेंनी फटकारले, पिट्याभाईने मनसेलाच सोडले; नाराज रमेश परदेशीचा भाजपमध्ये प्रवेश

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुळशी पॅटर्नफेम अभिनेता पिट्याभाई म्हणजेच रमेश परदेशी याला भरसभेत आरएसएसच्या गणवेशातील फोटोवरून फटकारले होते. यानंतर काही दिवसांत पिट्याभाईने मनसेला रामराम ठोकत भाजपात प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वी परदेशी याने आरएसएसच्या पथसंचालनामध्ये भाग घेतलेल्याचा फोटो पोस्ट केला होता.

यानंतर राज यांनी पुण्याच्या दौऱ्यावर परदेशी याला सुनावले होते.

”छातीठोकपणे सांगतो, मी संघाचा कार्यकर्ता आहे. असं म्हणताय, तर मग इथे कशाला टाईमपास करायला आलात? एकाच ठिकाणी कुठे तरी राहा”, असे राज ठाकरे म्हणाले होते. यावर पिट्याभाईने राज ठाकरे मला असं काही म्हणाले हे साफ चुकीचं आहे. असा एकही शब्द त्यांच्याकडून आलेला नाही. मी तुम्हाला सर्व अॅक्ट करुन दाखवलं. माझी कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही.

अंतर्गत पद्धतीने घडलेला विषय, अतिशय गोपनीय ठेवलेली बैठक त्यातला हा विषय अशा पद्धतीने बाहेर का आला, हे मी माझ्या नेत्यांना विचारेन. या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे. ज्यांनी कोणी हे बाहेर काढलं ते पक्षाचे शत्रू आहेत, असे म्हटले होते.

परंतू, या गोष्टीमुळे नाराज झालेल्या पिट्याभाईने आता थेट भाजपात प्रवेश केला आहे. महत्वाचे म्हणजे पिट्याभाईच्या प्रवेशावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते. पिट्याभाई मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष होता.