अजब फतवा; कडाक्याच्या थंडीत पुण्यात शेकोटीला बंदी, महापालिकेच्या निर्णयाने संताप

पुण्यात कडाक्याची थंडी वाढली असताना महापालिकेने शेकोटी पेटवण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील अनेक गृहनिर्माण संस्था, व्यावसायिक संकुले आणि निवासी परिसरांमध्ये सुरक्षा रक्षक रात्रीच्या वेळी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोट्या पेटवतात. यासाठी लाकूड, कचरा किंवा कोळसा जाळला जातो. मात्र या ज्वलनातून मोठ्या प्रमाणात धूर निर्माण होऊन शहरातील हवेचे प्रदूषण वाढत असल्याचे महापालिकेचे निरीक्षण आहे.

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने विविध कायदे आणि नियम लागू केले आहेत. त्यानुसार सोसायटी परिसरात किंवा रस्त्यांवर शेकोटी पेटवून कोळसा, बायोमास, प्लास्टिक, रबर किंवा कोणताही कचरा जाळण्यास मनाई आहे. अशा प्रकारे धूर निर्माण करणे हा नियमभंग मानला जाईल.

कोणत्याही गृहनिर्माण संस्थेतील वॉचमन, गफाई आणि इतर कामगार तसेच मनपा कर्मचारी, कंत्राटी कामगार किंवा मनपा-ठेकेदारांकडील कर्मचारी नियमांचे उल्लंघन करताना आढळल्यास, पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.